मुंबई : टाटा समूहातील वाहननिर्मितीतील कंपनी टाटा मोटर्सने सरलेल्या तिमाहीत तोटय़ात लक्षणीय सुधारणा नोंदविली आहे. समूहातील ब्रिटिश कंपनी जग्वार लँड रोव्हरच्या यशावर कंपनीला ही कामगिरी बजावता आली आहे.

कंपनीला एप्रिल ते जून २०२१ या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत ४,४५०.१२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ८,४४३.९८ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा तो निम्म्यावर आला आहे. टाटा मोटर्सचा एकत्रित महसूल जून २०२१ अखेर ६६.४०६.०५ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वीच्या ३१,९८३.०६ कोटी रुपयांच्या तुलनेत तो दुपटीहून अधिक आहे.

जग्वार लॅँड रोव्हरने या तिमाहीत महसुलात ७३.७ टक्के वाढ नोंदवली आहे. परकीय चलनांमधील महसूल ५ अब्ज पौड आहे. तर करपूर्व तोटा ११ कोटी डॉलरचा राहिला आहे. आलिशान मोटार गटात कंपनीने वाहन विक्रीत तब्बल ६८ टक्के वाढ राखली आहे.

टाटा मोटर्सने निर्यातीसह एकूण १.१४ लाख वाहनांची विक्री नोंदवली असून त्यात ३५१ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी पहिल्या तिमाहीदरम्यान कडक टाळेबंदी सुरू होती. परिणामी, निर्मिती उद्योग तसेच व्यावसायिक हालचाल पूर्ण ठप्प होती.

कंपनीचा व्यवसाय पूर्वपदावर येत असल्याचे यंदाचे वित्तीय निष्कर्ष हे ठळक लक्षण आहे. वार्षिक तुलनेत जवळपास सर्वच गटातून यंदा वाढ नोंदली गेली आहे. टाटा मोटर्सच्या कामगिरीला यंदा जग्वार आणि लँड रोव्हरच्या दमदार वाहन विक्रीने साथ दिली आहे.

’  थिएरी बोलोरी, मुख्याधिकारी, जग्वार लँड रोव्हर