भारतीय विदेश गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्फे (एफआयपीबी) सिंगापूर एअरलाईन्सला भारताच्या सर्व भागात ‘टाटा कॉंग्लोमरेट’च्या साथीने विमानसेवा पुरवण्याची संमती मिळाली असल्याची माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या उच्चाधिका-याकडून मिळाली आहे.
‘एफआयपीबी’च्या गुरूवारी झालेल्या बैठकीनंतर आर्थिक व्यवहार सचिव अरविंद मायाराम यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
नव्या व्यवसायात सुरुवातीला सिंगापूर एअरलाईन्सची ४९ टक्के गुंतवणूक असणार असून उर्वरित ५१ टक्के गुंतवणूक टाटा ग्रुपची असेल. सिंगापूर एअरलाईन्स यासाठी सुरूवातीला ४९ कोटी डॉलर्स गुंतवणार आहे. भारतात विमानसेवा पुरवण्याआधी भागीदारीत सेवा पुरवणा-या विमान कंपन्यांना इतर नियामक मंजूरी मिळणे आवश्यक असते.  
सिंगटेलतर्फे देण्यात आलेला थेट परकीय गुंतवणूकीचा प्रस्तावही ‘एफआयपीबी’ने मान्य केला असल्याची माहिती मायाराम यांनी यावेळी दिली.
मलेशियाच्या एअर आशियानेही टाटा सन्सबरोबर भारतीय हवाई वाहतूक सेवेसाठी उत्सुकता दाखवली आहे.
टाटा समूहाचे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये (टाटा एअरलाईन्स) भारतीय हवाई वाहतूक कंपनी सुरू केली होती. दोन दशकानंतर तिचे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया असे नामकरण झाले.