चणचणग्रस्त जेट एअरवेजला टाटांचे पंख

मुंबई : नरेश गोयल यांच्या आधिपत्याखालील आणि सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या जेट एअरवेजमध्ये टाटा समूहाच्या स्वारस्याच्या चर्चेची तड शुक्रवारी लागणे अपेक्षित आहे. टाटा समूहाच्या उद्योगसाम्राज्याचे नियंत्रण हाती असलेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या होऊ घातलेल्या बैठकीत या विषयावर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सूत्रांकडून समजते.

टाटा समूहाच्या अधिपत्याखाली दोन प्रवासी विमान कंपन्या सध्या कार्यरत आहेत. विस्तारा ही सिंगापूर एअरलाइन्सबरोबर भागीदारीतून, तर एअर-एशिया इंडिया ही मलेशियातील एअर एशिया या किफायती हवाई सेवा कंपनीशी सामंजस्यातून टाटांनी सुरू केली आहे. त्यामुळे आणखी एक कंपनी पंखाखाली घेण्याची संधीचा टाटा समूह नक्कीच विचारात घेईल, असे या प्रक्रियेशी संलग्न सूत्रांनी सांगितले. मध्यंतरी प्रारंभिक चाचपणी म्हणून थेट जेट एअरवेजचे सर्वेसर्वा नरेश गोयल यांच्याशी टाटा समूहाकडून वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा होती. मात्र ती अफवाच असल्याचे जेट एअरवेजने खुलासा केला होता. मात्र शुक्रवारच्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा जेट एअरवेजच्या संपादनाचा मुद्दा विषयपत्रिकेवर असल्याचे कळून येते.

गेल्या आठवडय़ात जेट एअरवेजचे सह-मुख्य कार्यकारी आणि मुख्य वित्तीय अधिकारी अमित अगरवाल यांनी सध्याच्या आर्थिक अडचणीवर मात म्हणून गुंतवणुकीत स्वारस्य दाखविणाऱ्या अनेक पक्षांशी बोलणी सुरू असल्याची कबुली दिली आहे. तथापि टाटा समूहाच्या स्वारस्याबाबत स्पष्टपणे त्यांनी भाष्य करणे टाळले.

जेट एअरवेजमध्ये गोयल आणि कुटुंबीयांची मिळून ५१ टक्के मालकी आहे, तर आखातातील इतिहाद एअरवेज या कंपनीने २४ टक्के भांडवली हिस्सा मिळविला आहे. सरलेल्या सप्टेंबरअखेर तिमाहीत जेट एअरवेजने १,२६१ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला असून, कंपनीला सलग तिसऱ्या तिमाहीत झालेला हा १,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा तोटा आहे. आवश्यक परिचालन निधी मिळविण्यासाठी जेट एअरवेजने आपल्या ताफ्यातील सहा बोइंग ७७७ विमाने विक्रीला काढली आहेत.

२४.५२ टक्क्यांची ‘जेट’ उसळी

टाटा समूहाकडून संपादनाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याच्या वृत्ताचे उत्साही प्रतिबिंब जेट एअरवेजच्या समभागात गुरुवारी उमटले. सत्राची सुरुवातच या समभागाने आठ टक्क्यांची उत्साही झेप घेत केली. कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर देता येणार नाही, इतकी आर्थिक चणचण असलेल्या आणि सलग तीन तिमाहीत तोटा नोंदविणाऱ्या या कंपनीत टाटांचे स्वारस्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने सकारात्मक ठरले. दिवस सरत गेला तसतसे समभागाची मूल्यझेपही विस्तारत गेली. सत्रअखेरीस बुधवारच्या तुलनेत तो दमदार २४.५२ टक्क्यांच्या (प्रति समभाग ६३.२० रुपये कमाईसह) उडीसह ३२०.९५ रुपयांवर स्थिरावलेला दिसला. समभागाचा वार्षिक उच्चांक ३३५ रुपयांचा असून, गुरुवारच्या अपवादात्मक मोठय़ा उसळीने त्याच्या अगदी समीप तो पोहोचला आहे.