नागरी हवाई वाहतूक कंपनीतील हिस्सा खरेदीबाबत टाटा सन्सचे स्पष्टीकरण

मुंबई : आर्थिक विवंचनेतील जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदीबाबतची चर्चा ही केवळ प्राथमिक स्तरावर असून अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याचे टाटा सन्सने स्पष्ट केले आहे. जेट एअरवेजनेही याबाबत कोणताही संपर्क केला नसल्याचेही टाटा समूहाचे म्हणणे आहे.

देशातील दोन नवागत नागरी हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये भागीदारी असलेल्या टाटा समूहामार्फत जेट एअरवेजमधील हिस्सा खरेदी होण्याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच टाटा सन्सच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक झाल्याने यामध्ये याबाबतच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची अटकळ होती. मात्र कंपनीने सायंकाळी उशिरा जाहीर केलेल्या निर्णयानुसार असा कोणताही प्रस्ताव अथवा निर्णय नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबची चर्चा केवळ प्राथमिक स्तरावर असल्याचे मात्र समूहाने नमूद केले.

आखाती कंपनी एतिहादबरोबर भागीदारी असलेल्या जेट एअरवेजने आर्थिक संकटापोटी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी, वैमानिक, अभियंते यांचे वेतनही वेळेवर दिलेले नाही. कंपनी अन्य खरेदीदाराच्या शोधात असल्याच्या चर्चेबाबत भांडवली बाजार नियामक तसेच प्रमुख भांडवली बाजारांनीही कंपनीकडे स्पष्टीकरण मागितले होते.

टाटा समूहाची सध्या देशातील दोन विमान वाहतूक कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे. पैकी विस्ताराबरोबर सिंगापूर एअरलाईन्स तर एअरएशिया इंडियामध्ये मलेशियाच्या एअर एशियासह भागीदारी आहे.

टाटा समूहाने मध्यंतरी सार्वजनिक एअर इंडियाकरिताही उत्सुकता दर्शविली होती. प्रत्यक्ष कंपनीऐवजी एअर इंडियाच्या सहयोगी कंपन्यांमध्ये समूहाला रस होता.

जेट एअरवेजमध्ये एतिहादचा २४ टक्के हिस्सा आहे. सप्टेंबरअखेर संपलेल्या  चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने १,२६१ कोटी रुपयांचे नुकसान सोसले आहे.