एअरबस कंपनीची तब्बल २० विमाने भाडय़ाने घेत टाटा-सिंगापूर एअरलाइन्स भागीदारीची हवाई सेवा सुरू होणार आहे. यंदाच्या हिवाळी मोसमात ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. टाटा समूहाच्या भागीदारीची एअर एशिया इंडियाचे ‘टेक ऑफ’  येत्या आठवडय़ात होणार असून, देशांतर्गत विमान वाहतूक सेवा देणारी ही टाटांची दुसरी कंपनी असेल.
सिंगापूर एअरलाइन्सबरोबर टाटा समूहाने भारतात विमान सेवा प्रारंभ करण्यासाठी भागीदारी केली आहे. यात टाटा ५१ टक्क्यांसह प्रमुख प्रवर्तक कंपनी असणार आहे. कंपनी दिल्ली, मुंबई, पणजी, पटना, चंदिगड, श्रीनगर, हैदराबाद, बंगळुरू येथून सुरुवात करणार आहे. कंपनीने एप्रिलमध्येच हवाई उड्डाणाच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. विमाने भाडय़ाने देणाऱ्या बीओसी एव्हिएशन कंपनीच्या गुंतवणूक संबंध विभागाच्या प्रमुख क्लॅरी लिओ यांनी ‘आयटा’च्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीदरम्यान सांगितले की, टाटा-सिआ कंपनीने ए३२० जातीची २० विमाने भाडय़ाने घेण्यासाठी आमच्याकडे मागणी नोंदविली आहे. प्रत्यक्षात ही विमाने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दिली जाण्याची शक्यता आहे, असेही त्या म्हणाल्या.
टाटा समूहाची मलेशियास्थित विमान कंपनीबरोबरची दुसरी भागीदारी अर्थात एअर एशिया इंडियाची देशांतर्गत विमान सेवा येत्या १२ जूनपासून सुरू होत आहे. बंगळुरू ते पणजी या प्रवासासाठी ३० मेपासून तिकीट नोंदणीही सुरू झाली आहे. कंपनीने माफक दरात म्हणजे सर्वसमावशेक ९९० रुपयांच्या भाडय़ाने ही सेवा उपलब्ध करत स्पर्धक हवाई कंपन्यांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

डीएचएफएलची पालघरमध्ये शाखा
मुंबई : अग्रेसर गृहकर्ज कंपनी ‘डीएचएफएल’ने य्ठाणे जिल्ह्य़ातील पालघर (पश्चिम) येथे या परिसरातील पहिली शाखा नुकतीच सुरू केली. यावेळी झालेल्या समारंभास डीएचएफएलचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी राकेश मक्कर उपस्थित होते. पालघर ही निवासी मालमत्तेची एक वेगाने उदयाला येत असलेली बाजारपेठ आहे; या भागातील खासकरून निम्न आणि मध्यम उत्पन्न गटांमधील तसेच किफायतशीर घरांच्या क्षेत्रातील मागणी लक्षात घेता पालघरमध्ये नवी गृहवित्त शाखा सुरू करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी मक्कर यांनी केले. डीएचएफएलच्  या या पालघर शाखेतर्फे गृहकर्ज, गृहविस्तार कर्ज, गृहसुधार कर्ज, प्लॉटसाठी कर्ज, तारण कर्ज, लीझवरील भाडे कर्ज आणि अनिवासी भारतीयांसाठीचे मालमत्ता कर्ज यांसारख्या गृहकर्जाच्या योजना उपलब्ध केल्या जातील. या शाखेतर्फे निम्न आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी गृहप्रकल्पांसाठी प्रकल्प कर्जेही दिली जाणार आहेत.

‘फियाट’कडून ‘हॅलो लाइफ’ मोहीम
मुंबई: इटलीच्या फियाट ग्रुप ऑटोमोबिल्सच्या पूर्ण मालकीची उपकंपनी फियाट ग्रुप ऑटोमोबिल्स इंडियाने ‘हॅलो लाइफ’ नावाची नवी ब्रॅण्ड मोहीम सादर केली आहे. या मोहिमेला इटालियन जीवनपद्धतीकडून प्रेरणा मिळाली आहे. इटालियन माणूस आपले जीवन भरभरून जगतो, कोणतीही गोष्ट तो समरसून करतो आणि जीवनात कोठेही चिंता अथवा काळजीला स्थान देत नाही. फॅशन, संगीत व कला क्षेत्रातील ज्या व्यक्ती हॅलो लाइफच्या आनंददायी जीवन या संकल्पनेशी निगडित असतील, त्यांना फियाटकडून मदत केली जाईल, असे यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आले आहे. तरुण फॅशन डिझायनर असलेल्या आलिशा डिलिमा हिची पहिली हॅलो लाइफ अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली असून, तिने या ब्रॅण्ड मोहिमेच्या प्रारंभी आपले आलिशा डिलिमा हे फॅशनेबल कपडे सादर केले.