ग्राहक मोबाईल व्यवसायातून माघार

मुंबई : दूरसंचार क्षेत्रातून काढता पाय घेऊ पाहणाऱ्या टाटा समूहाने तिच्या या क्षेत्रातील उपकंपनीतील सर्व गुंतवणूक निर्लेखित (राईट ऑफ) केली आहे. तोटय़ातील टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसमधील २८,६५१.६९ कोटी रुपये निर्लेखित करण्याचा निर्णय समूहाने घेतला आहे.

याबाबतची माहिती सोमवारी भांडवली बाजाराला कळविण्यात आली. समूह टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस अंतर्गत येणारा सर्व ग्राहक मोबाईल व्यवसाय स्पर्धक भारती एअरटेलला विकण्याच्या प्रक्रियेत सध्या आहे. तर या उपकंपनीचा उद्यम गटातील सेवा व्यवसाय टाटा कम्युनिकेशन्समध्ये विलिन करण्यात येणार आहे.

टाटा सन्सच्या या निर्णयामुळे समूहाचा २०१७-१८ मधील एकत्रित निव्वळ नफा ४,३७९ कोटी रुपयांनी कमी होणार आहे. २०१२ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनिलहरी रद्द करण्याच्या निर्णयामध्ये टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसच्या तीन परवान्यांचाही समावेश होता. उपकंपनीतून जपानी भागीदार एनटीटी डोकोमोने फेब्रुवारी २०१७ मध्येच माघार घेतली आहे.