आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी टाटा स्टीलमध्ये टाटा मेटॅलिक्स लिमिटेड आणि तिची १०० टक्के अंगीकृत कंपनी टाटा मेटॅलिक्स कुबोटा पाइप्स लिमिटेडचे विलिनीकरण करण्याला उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. मुंबई आणि कोलकाता उच्च न्यायालय तसेच संबंधित कंपन्यांच्या भागधारक व धनकोंनी या संबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हे विलिनीकरण अधिकृतपणे पूर्ण होईल.
टाटा स्टील आणि टाटा मेटॅलिक्स या दोन्ही सूचिबद्ध कंपन्यांनी संबंधितशेअर बाजारांना आपल्या या विलिनीकरण प्रस्तावाबाबत अधिकृतरीत्या कळविले आहे. १९९० मध्ये स्थापित टाटा मेटॅलिक्समध्ये टाटा स्टील व अन्य उपकंपन्यांचा ५०.०९ टक्के भांडवली वाटा आहे. तर टाटा मेटॅलिक्सने २००७ साली कुबोटा आणि मेटल वन या जपानी कंपन्यांसह संयुक्त भागीदारीत टाटा मेटॅलिक्स कुबोटा पाइप्स लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी मात्र कोणत्याही शेअर बाजारात सूचिबद्ध नाही. स्वतंत्र मूल्यांकनकर्त्यांकडून निश्चित केल्या गेलेल्या टाटा स्टील व टाटा मेटॅलिक्सचे विलिनीकरण प्रस्तावानुसार, टाटा मेटॅलिक्सच्या १० रु. दर्शनी मूल्याच्या २९ समभाग असलेल्या भागधारकांना टाटा स्टीलचे १० रु. दर्शनी मूल्याचे चार समभाग हे विलीनकरणापश्चात अदा केले जातील.