टाटा स्टीलने तिच्या ३१ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना १८० कोटी रुपये बोनस म्हणून जाहिर केले आहे. टाटा समूहातील देशातील आघाडीच्या या पोलाद कंपनीची वाटचाल बिकट असतानाही २०१२-१३ या आर्थिक वर्षांसाठीचा हा बोनस देण्यात आला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यात येत असल्याचे कंपनीने सोमवारी मुंबई शेअर बाजाराला कळविले. याचा लाभ कंपनीच्या ३०,८२४ कर्मचाऱ्यांना होईल. तर ही रक्कम १८०.५० कोटी रुपये असेल. १३,३११ ते १,४३,६५३ रुपये अशी ती किमान ते कमाल कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कंपनीच्या जमशेदपूर येथील १७,२५४ कर्मचाऱ्यांना याअंतर्गत १०३.६० कोटी रुपये मिळणार आहेत. याबाबतचा करार कंपनीतील मान्यताप्राप्त संघटना टाटा वर्कर्स यूनियन आणि व्यवस्थापना दरम्यान झाला. उभयतांमार्फत अनुक्रमे संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद सिंग व व्यवस्थापकीय संचालक हेमंत नेरुरकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. नेरुरकर हे महिन्यानंतर निवृत्त होत आहेत.
कोरससारखा ब्रिटन ब्रॅण्ड खरेदी करणारी टाटा स्टील ही देशातील पहिली खासगी पोलाद निर्मिती कंपनी आहे. १९०७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीची वार्षिक २.९ कोटी टन निर्मिती क्षमता आहे.