३५,००० कोटींचा रोखीचा व्यवहार

सुमारे ४८,१०० कोटी रुपयांच्या कर्जभार असलेल्या भूषण स्टीलवर अखेर टाटा स्टीलचे नियंत्रण आले आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेत टाटा स्टीलने निविदा मिळविली आहे. टाटा समूहातील पोलाद कंपनीने या व्यवहारासाठी ३५,००० कोटी रुपये मोजले असल्याचे कळते. रोखीने हा व्यवहार झाला असून याद्वारे टाटा समूह देशातील अव्वल पोलाद उत्पादक ठरला आहे. ५६ लाख टन उत्पादन क्षमता असलेल्या भूषण स्टीलच्या अधिग्रहणामुळे टाटा स्टीलच्या १३ लाख टन उत्पादन क्षमतेत आता अधिक भर पडणार आहे.

भूषण स्टीलला कर्ज देणाऱ्या बँकांच्या समितीने टाटा स्टीलची खरेदीसाठीची निविदा मंजूर केल्याची माहिती शुक्रवारी जाहीर केली. याबाबतच्या व्यवहाराला आता राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद तसेच भारतीय स्पर्धा आयोगाची परवानगी लागेल. टाटा स्टीलला नादारी आणि दिवाळखोरी संहितेच्या कंपनी नादारी मुक्तता प्रक्रिया यंत्रणेची निविदा जिंकल्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे.

भूषण स्टीलवर विविध बँकांचे ४८,१०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. तिच्या लिलावाकरिता कंपनीतील कर्मचारी गटानेही याबाबतच्या खरेदी प्रक्रियेत भाग घेतला होता. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाच्या निर्देशानुसार रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चित केलेल्या १२ थकीत कर्जदार कंपन्यांच्या यादीत भूषण स्टीलचेही नाव आहे.

भूषण स्टील खरेदीकरिता पात्र ठरल्यानंतर टाटा स्टीलने येत्या पाच वर्षांत दुप्पट पोलाद निर्मितीचे लक्ष्य जाहीर केले आहे. या नव्या व्यवहारामुळे टाटा स्टीलने देशातील या क्षेत्रातील अग्रेसर जेएसडब्ल्यू स्टीलला मागे टाकले आहे. तर भूषण स्टीलच्या दाव्यानुसार ती पोलाद निर्मितीत देशातील तिसरी मोठी कंपनी आहे.