13 July 2020

News Flash

टाटा स्टील विक्री प्रक्रिया सुरू

टाटा स्टीलच्या युरोपातील तोटय़ातील प्रकल्प विक्रीची अखेर सोमवारी सुरू झाली.

युरोपातील प्रकल्पाची पहिली निर्गुतवणूक फेरी; टाटा समूहाकडून सल्लागारही नियुक्त

टाटा स्टीलच्या युरोपातील तोटय़ातील प्रकल्प विक्रीची अखेर सोमवारी सुरू झाली. टाटा समूहातील युरोपातील व्यवसाय (लॉंग प्रॉडक्ट्स) ग्रेबुल कॅपिलटला विकत टाटा स्टीलने निर्गुतवणूक प्रक्रिया पार केली.

अवघ्या एक पौंड या नाममात्र बोलीवरून ही प्रक्रिया सुरू करताना ही प्रक्रिया जून २०१६ पर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ग्रेबुल कॅपिटल गुंतवणूक आणि वित्तीय सहकार्य म्हणून ४० कोटी पौेड (५७ कोटी डॉलर) देऊ करणार आहे. ते बँका तसेच भागधारकांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत.

ग्रेबुल कॅपिटलबरोबर सामंजस्य करार टाटा स्टीलने केला आहे. या व्यवहामुळे टाटा स्टीलच्या युरोपातील व्यवसाय, निर्मिती प्रकल्प, मालमत्ता तसेच अन्य दायित्वावर ग्रेबुलचे पूर्णत: वर्चस्व स्थापन होणार आहे. त्याचबरोबर या व्यवहारामुळे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना पहिल्या वर्षांत तीन टक्के वेतन कपात तसेच निवृत्ती वेतन योजना लागू होणार आहे. मात्र यामुळे कंपनीतील ४,४०० रोजगार वाचल्याची प्रतिक्रिया कंपनीतील संघटनेने दिली आहे.

टाटा स्टीलने युरोपातील आपले व्यवसाय विकण्यासाठी केपीएमजी एलएलसी या सल्लागार कंपनीची नियुक्तीही सोमवारीच जाहीर केली. युरोपातील व्यवसाय आढाव्यासह आवश्यक प्रकल्पांची विक्री प्रक्रिया तिच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल, असे टाटा स्टीलने स्पष्ट केले आहे. यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची मान्यता घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टाटा स्टील तिच्या युरोपातील विकणार असलेल्या व्यवसायांमध्ये पोर्ट टॅलबोट या प्रकल्पाचाही समावेश आहे. कंपनीच्या ब्रिटनमधील कंपनीत ४,४०० तर फ्रान्समधील प्रकल्पात ४०० कर्मचारी आहेत.

कंपनी ताब्यात आल्यानंतर तिचे नावही बदलण्याचे ग्रेबुल कॅपिटलने निश्चित केले असून ते ‘शुन्थोर्पे स्टीलवर्क्‍स’ असे करण्यात येणार आहे. सध्या हा प्रकल्प ‘शून्थोर्पे स्टील’ म्हणून ओळखला जातो.

टाटा समूहातील टाटा स्टीलने २००७ मध्ये अँग्लो-डच बनावटीच्या कोरसवर ताबा घेत युरोपातील पोलाद निर्मिती व्यवसायात शिरकाव केला होता. यामुळे टाटा स्टील ही जगातील पाचवी बलाढय़ स्टील उत्पादक कंपनी ठरली होती. एकाद्या भारतीय कंपनीकडून होणारा सर्वात मोठा व्यवहारही याद्वारे नोंदला गेला होता.

ब्रिटिश स्टीलच्या पुन्हा आठवणी..

१९६७ मध्ये १४ प्रमुख स्टील उत्पादकांनी एकत्र येऊन ब्रिटिश स्टील कॉर्पोरेशन स्थापन केली होती. तिचे राष्ट्रीयकरणही करण्यात आले. त्यातील काही प्रकल्प मंदीच्या गर्तेत सापडल्यानंतर १९८७ मध्ये कॉर्पोरेशनचे खासगीकरण करण्यात आले. यानंतर तिचे नाव ब्रिटिश स्टील असे करण्यात आले. १९९९ मध्ये तिचे कोनिक्लिजके हूगोवेन्समध्ये विलिनीकरण करण्यात आले. टाटा समूहाने २००७ मध्ये १४ अब्ज डॉलर मोजून २००७ मध्ये ब्राझीलच्या सीएसएनबरोबर मात करत तिच्यावर ताबा मिळविला होता. गेल्या काही महिन्यांपासून टाटा स्टीलला युरोपातील तिच्या विविध प्रकल्पांपासून मोठे आर्थिक नुकसान होत होते. त्यासाठी ते विकून टाकण्याचे पाऊल समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी उचलले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 6:41 am

Web Title: tata steel starts uk business sale
टॅग Tata Steel
Next Stories
1 रिझव्‍‌र्ह बँक कधीही कोणाकडे पैसे मागत नाही : डॉ. राजन
2 ‘ईएसडीएस’ची २०० कोटींची गुंतवणूक
3 सेन्सेक्स, निफ्टीची झेप
Just Now!
X