* स्वस्त चिनी आयातीचा फटका * स्टील प्लेट उत्पादनही बंद
मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या स्वस्त चिनी पोलाद आयातीचा फटका टाटा समूहाला बसला असून परिणामी टाटा स्टीलच्या युरोपातील १,२०० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. कंपनी युरोपातील स्टील प्लेट उत्पादनही थांबविण्याच्या निर्णयापत आली आहे.
टाटा समूहातील टाटा स्टीलने युरोप प्रकल्पात १,२०० कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कंपनी टाटा स्टीलच्या स्कन्थोरपेच्या प्रकल्पातील ९०० व स्कॉटलॅण्डच्या प्रकल्पातील २७० जणांना नारळ देणार आहे. कंपनीने या भागातील स्टील प्लेट प्रकारच्या धातूचे उत्पादन थांबविण्याचाही निर्णय घेतला आहे.

कंपनी पुनर्बाधणीच्या मोहिमेंतर्गत ही नोकरकपात असल्याचे टाटा स्टीलने म्हटले आहे. असे असले तरी चीनसारख्या देशांकडून मोठय़ा प्रमाणात स्वस्त पोलाद आयात होत असून त्याचा सामना करण्यासाठी कंपनी उपाययोजना करत असल्याचे टाटा स्टीलच्या युरोप व्यवसायाचे मुख्य कार्यकारी कार्ल कोल्हर यांनी म्हटले आहे.

स्वस्त चिनी पोलाद आयातीबरोबरच डॉलरच्या तुलनेतील भक्कम पौंड चलन, वाढते विजेचे दर हेही युरोपातील कंपनीच्या व्यवसायावर विपरीत परिणाम करत असल्याचे टाटा स्टीलने म्हटले आहे. युरोपातील तीन प्रकल्पांपैकी एक पूर्णत: बंद करण्यात येत असून उर्वरित प्रकल्पांमध्ये अंशत: उत्पादन घेतले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

ब्रिटन अर्थव्यवस्थेत तग धरण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरू असले तरी व्यवसायवृद्धीसाठी योग्य पद्धतीची आवश्यकता टाटा स्टीलने प्रतिपादन केली आहे. एकूणच युरोपीय स्टील उद्योगावर विपरीत परिणाम करणाऱ्या चीनकडून होणाऱ्या गेल्या दोन वर्षांतील वाढत्या स्वस्त आयात स्टील प्लेटमुळे स्टील उत्पादनांच्या किमती रोडावल्याचेही कोल्हर म्हणाले.