नवी दिल्ली : टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस (टीटीएसएल)चे भारती एअरटेलमधील विलीनीकरण दूरसंचार विभागाने मंजूर केले आहे. मात्र याकरिता भारती एअरटेलला ७,२०० कोटी रुपयांच्या बँकहमीची अट घालण्यात आली आहे.

टाटा समूहातील ‘टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस’ने जपानच्या डोकोमोसह भागीदारीतून भारतातील दूरसंचार क्षेत्रात  प्रवेश केला. त्यांची या क्षेत्रातील टाटा डोकोमो ही नाममुद्रा प्रीपेड तसेच पोस्टपेड मोबाइल सेवेसाठी कार्यरत होती. जपानी कंपनीने काढता पाय घेण्याचे निश्चित केल्यानंतर टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसच्या अधिग्रहणाकरिता भारती एअरटेलने रस दाखविला आहे.

केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी ९ एप्रिल रोजी विलीनीकरण मंजुरीचे आदेश दिल्याचे दूरसंचार अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. तसेच उभय कंपन्यांना न्यायप्रक्रियेतील माहिती देण्यासही सांगण्यात आले आहे.

भारती एअरटेलला टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसकडून घेतलेल्या ध्वनिलहरींसाठी १,२०० कोटी रुपये, तर एकवेळच्या ध्वनिलहरीचे शुल्कापोटी ६,००० कोटी रुपये बँकहमी जमा करण्यास सांगण्यात आले.

टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसच्या अधिग्रहणाने भारती एअरटेलकडे टाटा समूहाचा १९ दूरसंचार परिमंडळातील भ्रमणध्वनी व्यवसाय येणार आहे. यामुळे भारती एअरटेलकडे ४जी तंत्रज्ञानासाठीचे १७८.५ मेगा हर्ट्झचे अतिरिक्त परवाने प्राप्त होतील.