नसली वाडियांना हटविण्यासाठी टाटा समूह आग्रही

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडीनंतर सायरस मिस्त्री यांना समूहातील अन्य कंपन्यांच्या प्रमुख पदावरूनही दूर करू पाहणाऱ्या टाटा सन्सने आता मिस्त्री यांचे पाठीराखे समजले जाणाऱ्यांवर शंरसंधान सुरू केले आहे. समूहातील टाटा केमिकल्सच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांना काढण्यासह कंपनीचे स्वंतत्र संचालक नसली वाडिया यांना बाजूला सारण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून निष्कासित करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांना समूहातील अन्य कंपन्यांवरही नेतृत्व न करू देण्यासाठी कंबर कसलेल्या टाटा समूहाने आता मिस्त्री यांच्या पाठीराख्यांकडे नजर वळविली आहे. याचाच भाग म्हणून वाडिया समूहाचे अध्यक्ष नसली एन. वाडिया यांना टाटा केमिकल्सच्या स्वतंत्र संचालक पदावरून हटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

नसली वाडिया हे टाटा सन्स तसेच समूहातील टाटा केमिकल्सच्या संचालक मंडळातही आहेत. टाटा केमिकल्समध्ये वाडिया यांच्यासह डीसीबी बँकेचे अध्यक्ष नासीर मुनजी, नाबार्डचे माजी अध्यक्ष वाय. एस. पी. थोरात तसेच विपणन व्यावसायिक विभा पॉल ऋषी याही स्वतंत्र संचालक आहेत.

टाटा केमिकल्समध्ये टाटा सन्सचा १९.३५ टक्के हिस्सा आहे. मिस्त्री यांना कंपनीच्या संचालक मंडळातून काढण्यासाठी इंडियन हॉटेल्सचीही विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याचे समूहाने गुरुवारीच जाहीर केले. त्याचबरोबर टाटा मोटर्सचीही याच कारणासाठी भागधारकांची सभा बोलाविण्याचा निर्णय टाटा सन्सने शुक्रवारी घेतला. कंपनीत समूहाचा २६.५१ टक्के भागीदारी आहे.

भास्कर भट यांचा राजीनामा

टाटा केमिकल्सचे संचालक भास्कर भट यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. कंपनीच्या संचालक मंडळाच्या दुपारी नियोजित बैठकीपूर्वीच भट यांनी आपला राजीनामा दिला. कंपनीबाबत आपण उपस्थित केलेल्या मुद्दय़ांकडे स्वतंत्र संचालकांनी दुर्लक्ष केल्याचे भट यांनी कारण दिले आहे. दरम्यान, टाटा मोटर्सच्या अध्यक्षपदावरूनही मिस्त्री यांना काढण्यासाठी कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात येणार आहे.