सामाजिक दातृत्वाचा लौकिक असलेल्या टाटा ट्रस्टने ग्रामीण भागातील महिलांमध्ये इंटरनेटचा प्रसार करण्याचे शिवधनुष्य उचलले असून, त्याला माहिती महाजालातील आघाडीच्या गुगलने साथ दिली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी मुंबईत टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते झाला. या वेळी गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन हेही उपस्थित होते.
या अंतर्गत ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी सायकलसारखे माध्यम निवडण्यात आले असून त्यावर इंटरनेट उपलब्धतेची सर्व सुविधा समाविष्ट करण्यात आली आहे. अशा १,००० सायकल ‘इंटरनेट साथी’ या गुगलने प्रशिक्षित केलेल्या सहकाऱ्यासह येत्या दीड वर्षांत ४,५०० खेडय़ांमध्ये पाच लाख महिलांना इंटरनेट साक्षर करतील.
दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी शुभारंभ केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत देशात ४.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व १८ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य जारी करण्यात आले होते.
इंटरनेट वापरणाऱ्या शहरी भागातील महिलांचे प्रमाण ५० टक्के असताना ग्रामीण भागात मात्र ते अवघे १२ टक्के आहे. नव्या उपक्रमाची सुरुवात गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्यांपासून करण्यात येणार आहे.