विविध कारणांनी थकीत अथवा बुडीत करदात्यांची नवी यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यादीतील ३१ कंपन्या, व्यक्तींकडे सरकारची १,५०० कोटी रुपयांची कर रक्कम थकीत आहे.

नव्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यातील कंपन्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दक्षिणेतील हैदराबाद शहरातील उद्योजकांचाही समावेश आहे. या कंपन्यांना देय करांसह थकीत रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नावे जाहीर केल्याने संबंधित कंपन्यांबाबत माहिती असल्यास ती विभागाकडे देण्याचे आवाहनही यानिमित्ताने करण्यात आले आहे. पुणेस्थित पथेजा ब्रदर्स फोर्जिग अ‍ॅण्ड ऑटो पार्ट्स (२२४.०५ कोटी रुपये), मुंबईतील होम ट्रेड (७२.१८ कोटी रुपये) यांचा समावेश या यादीत आहे.
प्राप्तिकर विभागाद्वारे जारी करण्यात आलेली थकीत करदात्यांची ही दुसरी यादी आहे. यापूर्वी मोठी रक्कम चुकविणाऱ्या १८ कंपन्यांची नावे स्पष्ट झाली आहेत. त्यामध्ये ५०० कोटी रुपयांहून अधिक कर थकविणाऱ्यांचा समावेश होता. महिन्याभराच्या आत नवी यादी जारी करण्यात आली आहेत. संसदेत नुकत्याच देण्यात आलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१४ अखेर एकूण थकीत कर रक्कम ३,११,०८० कोटी रुपये आहे.