News Flash

प्राप्तिकर नियोजन : नियम आणि फायदे

३१ मार्चच्या आत प्राप्तिकर विवरणपत्र सादर करावे लागते.

पगारदार, व्यावसायिक, गुंतवणूकदार तसेच वरिष्ठ नागरिक आणि अति वरिष्ठ नागरिक यांच्या दृष्टीने २८ फेब्रुवारी, ३१ मार्च व ३१ जुलै या तारखा खूप महत्त्वाच्या असतात. २८ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होतो आणि अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकराविषयी नव्याने कोणत्या तरतुदी केल्या गेल्या आहेत याविषयी उत्कंठा असते. ३१ मार्चच्या आत प्राप्तिकर वाचविण्याच्या दृष्टीने काही विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागते आणि ३१ मार्चच्या आत प्राप्तिकर विवरणपत्र सादर करावे लागते.
नव्याने सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची किमान मर्यादा कितीने वाढली? ८० सी कलमानुसार मिळणाऱ्या वजावटीमध्ये वाढ झाली का? प्राप्तिकराच्या दरांमध्ये काही अनुकूल बदल झाले का? असे ठरावीक मुद्दे पाहिले जातात. तसेच ३१ मार्चच्या आत विशिष्ट योजनांमध्ये गुंतवणूक करून प्राप्तिकर वाचविणे म्हणजेच प्राप्तिकर नियोजन असा एक (गैर)समज अनेकांच्या मनात आढळतो. या तरतुदी महत्त्वाच्या नाहीत असे नाही, परंतु वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. प्राप्तिकर नियोजनाचा आवाका हा केवळ एवढय़ापुरताच मर्यादित नाही. या तरतुदींपलीकडेसुद्धा प्राप्तिकर वाचविण्यासाठी अनेक कलमे आणि तरतुदी आहेत.
दुसरे म्हणजे प्राप्तिकर कायद्याविषयी जाणून घेणे खूप किचकट आहे. तो आपला प्रांत नाही, असाही एक गैरसमज प्राप्तिकरदात्यांच्या मनात असतो. प्राप्तिकराच्या रूपात त्यांच्या उत्पन्नातील काही भाग कमी होत असल्याने त्यांच्या मनात प्राप्तिकर कायद्यांविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन होत असावा, परंतु प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी जाणून घेतल्यास चांगल्या प्रकारे प्राप्तिकर वाचू शकतो.
वाढती महागाई, वाढते खर्च आणि रुपयाची घसरणारी क्रयशक्ती हे पाहता प्रत्येक रुपया वाचविणे हे भविष्यकाळासाठी सर्वासाठीच महत्त्वाचे ठरणार आहे. प्राप्तिकराच्या रूपात पैसा वाचविणे म्हणजे एक प्रकारे पैसा मिळविण्यासारखेच आहे! म्हटलेच आहे ना, kRupee Saved is Rupee Earnedl  आणि म्हणून गुंतवणूक नियोजनाबरोबर प्राप्तिकर वाचविण्यासाठी प्राप्तिकर नियोजन करणेसुद्धा महत्त्वाचे आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांच्या शब्दात सांगायचे तर, kEvery citizen is entitled to plan his affairs to keep as much of his/her earnings as the policy of the law permits. Planning your taxes is neither avoidance nor evasion… But Prudence.l
बेन्झामिन फ्रॅन्कलिन हा जगप्रसिद्ध तत्त्ववेत्ता म्हणतो, ‘या जगात दोनच गोष्टी अटळ आहेत आणि त्या म्हणजे मृत्यू आणि प्राप्तिकर.’
मात्र मृत्यू अटळ असेल तर पुढे जाऊन असेही म्हणता येईल, की प्राप्तिकर वाचविणे हेही तितकेच अटळ आणि शक्य आहे. ते कसे काय? त्यासाठी प्राप्तिकर कायद्यातील विविध तरतुदी आणि प्राप्तिकर वाचविण्याचे विविध मार्ग यांची या स्तंभातून माहिती घेऊ या.
०  प्राप्तिकर नियोजनाचा हेतू :
प्राप्तिकर नियोजनाचा हेतू केवळ प्राप्तिकर वाचविणे एवढाच नसून करपश्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविणे आणि आपल्या स्वत:च्या तसेच कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे भांडवल तयार करणे हादेखील आहे. उत्पन्न कमी दाखवून प्राप्तिकर भरण्याचे टाळणे किंवा प्राप्तिकर चुकविणे हे प्राप्तिकर नियोजनामध्ये अपेक्षित नाही.
०  प्राप्तिकर नियोजन यशस्वी करण्यासाठी तीन नियम लक्षात ठेवा :
१. प्राप्तिकर कायद्यांमध्ये नमूद केलेल्या वजावटी आणि ‘रिबेट’ यांचा पुरेपूर लाभ घ्या.
२. प्राप्तिकर कायद्यांमध्ये नमूद केलेल्या तरतुदींचा उपयोग करून जास्तीत जास्त करमुक्त उत्पन्न मिळवा.
३. करप्राप्त उत्पन्नाची कुटुंबातच विभागणी करा.
०  प्राप्तिकर नियोजनाचे काही फायदे :
१. कायद्यानुसार प्राप्तिकर वाचतो.
२. वाचलेल्या प्राप्तिकराची रक्कम गुंतवून अधिक उत्पन्न मिळविता येईल.
३. असे उत्पन्न कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कल्याणाकरिता वापरले जाईल.
४. प्राप्तिकर नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये जी कागदपत्रे तयार होतील ती कर्ज घेण्यासाठी, अथवा पासपोर्ट/व्हिसा इत्यादींसाठी उपयोगी येतील.
लेखक गुंतवणूक व प्राप्तिकर नियोजन सल्लागार

अर्थसंकल्प अपेक्षा
सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे दुखणे खुंटलेली वाढ नव्हे, तर चलनवाढीची समस्या हीच आहे. अर्थसंकल्पाने चलनवाढीला खतपाणी घातले जाणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी. थेट लाभ हस्तांतरण योजनेत एलपीजीसह केरोसीन अनुदान आणले जावे. खतांसंबंधी धोरणांत सुधारणा, शेतकरी कल्याण व सिंचनावर वाढीव तरतूद अपेक्षित आहे. अन्यत्र खर्चाला आवर घालून अर्थमंत्री जेटली यांनी म्हणून २०१६-१७ मध्ये वित्तीय तूट ३.५ टक्क्यांच्या मर्यादेत राहील हे वचन पाळावेच लागेल. तसे झाले तरच व्याजाचे दर खाली येतील व अर्थवृद्धीला चालना मिळेल.
– मोहनदास पै
इन्फोसिसचे सहसंस्थापक व प्रत्यक्ष कर सुधारणासंबंधी स्थापित केळकर समितीचे सदस्य
सध्या निवृत्तिवेतन/ वर्षांसन (अन्युइटी ) पॉलिसीधारकांना मिळताना करपात्र आहे. मर्यादित असलेल्या सामाजिक सुरक्षेच्या सुविधा पाहता, उतारवयासाठी तरतूद म्हणून कमावत्या वयात गुंतवणूक क्रमप्राप्त असून, ती लाभदायक करण्यासाठी प्रोत्साहन आवश्यक आहे. शिवाय लाभार्थी हे बहुतकरून ज्येष्ठ नागरिक आहेत हे वास्तव लक्षात घेऊन, यंदाच्या अर्थसंकल्पात आयुर्विमा श्रेणीअंतर्गत पेन्शनसाठी प्राप्तिकर कलमांतर्गत स्वतंत्र वजावट जाहीर करण्यात यावी. पेन्शन किंवा अन्युइटी योजनेतून मिळणारी रक्कम जर त्याच वर्षी अन्य पेन्शन अथवा अन्युइटीच्या खरेदीसाठी उपयोगात आणली तर ती करमुक्त ठरेल अशी तरतूदही समाविष्ट केली जावी.
– विघ्नेश शहाणे
मुख्याधिकारी व पूर्णवेळ संचालक, आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्स
dattatrayakale9@yahoo.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2016 1:05 am

Web Title: tax plan rules and benefits
टॅग : Tax
Next Stories
1 होंडाची वाहने माघारी
2 अर्थसंकल्प.. समजुनि घ्यावा सहज..
3 ७४ वस्त्रोद्योग उद्याने; ३०,००० कोटींची गुंतवणूक
Just Now!
X