करदात्यांना १० जानेवारीपर्यंत मुभा

मुंबई : मध्यमवर्गीय पगारदार करदात्यांना दिलासा म्हणून, आर्थिक वर्ष २०१९-२० साठी (कर निर्धारण वर्ष २०२०-२१) प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत तिसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. व्यक्तिगत करदात्यांना त्यामुळे ३१ डिसेंबर २०२० ऐवजी आता १० जानेवारी २०२१ पर्यंतची वाढीव मुदत मिळाली आहे, तर लेख्यांचे परीक्षण करणे आवश्यक असलेल्या करदात्यांना आणि कंपन्यांना १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंतची वाढीव मुदत मिळाली आहे.

करोना विषाणूजन्य साथीच्या फैलावामुळे निर्माण केलेली परिस्थिती पाहता, अनेकवार मुदतवाढ दिली गेल्यानंतर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख वाढविण्याचा निर्णय बुधवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून घेण्यात आला. सरलेल्या मंगळवापर्यंत (२९ डिसेंबर) ४.५४ कोटी विवरणपत्रे करदात्यांकडून दाखल केली गेल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले.

गत वर्षी अंतिम मुदतीला शेवटचे तीन दिवस असताना दाखल झालेल्या विवरणपत्रांचे प्रमाण ४.७७ कोटी होते. तर अंतिम मुदतीपर्यंत दाखल झालेली विवरणपत्रे ५.६५ कोटी होती. हे पाहता यंदा अधिक कालावधी मिळूनही तुलनेने कमी विवरणपत्रे दाखल झाली असल्याचे तूर्त तरी दिसून येते.

याव्यतिरिक्त वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही ३१ डिसेंबर २०२० वरून दोन महिने वाढवून, २८ फेब्रुवारी २०२१ अशी निर्धारीत करण्यात आली आहे. शिवाय करासंबंधी वादाच्या निराकरणासाठी आखल्या गेलेल्या ‘विवाद से विश्वास’ योजनेनुसार संपत्तीचा खुलासा करण्याला सरकारने करदात्यांना अतिरिक्त वेळ दिला आहे.

या योजनेअंतर्गत कायद्यानुसार सांपत्तिक स्थितीचा आपणहून खुलासा करण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२० वरून ३१ जानेवारी २०२१ अशी वाढविण्यात आली आहे.

व्यक्तिगत करदाते : १० जानेवारी २०२१

कंपन्या : १५ फेब्रुवारी २०२१

जीएसटी विवरणपत्र : २८ फेब्रुवारी २०२१

‘विवाद से विश्वास’ : ३१ जानेवारी २०२१