सर्वाधिक बाजारमूल्यात टाटा समूहातील १० अब्ज डॉलर उलाढालीच्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने मंगळवारच्या मुंबई शेअर बाजारातील संथ वाटचालीत सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसीला मागे टाकले. ओएनजीसीच्या तुलनेत ३३९ कोटी रुपयांचे अधिक बाजारमूल्य कमावत टीसीएसने भांडवली बाजारात सूचीबद्ध कंपन्यांमध्ये अव्वल स्थान पटकावले. व्यवहाराअंती टीसीएसचा समभाग ०.३१ टक्क्यांनी वधारत, तर ओएनजीसीचा ०.५३ टक्क्यांनी घसरला. दोन्हीचे समभाग मूल्य अनुक्रमे १,४२९.६० रुपये व ३२६.६५ रुपयांवर स्थिरावले. टीसीएसचे बाजारमूल्य २,७९,८०४ कोटी रुपये तर ओएनजीसीचे २,७९,४६५ कोटी रुपये राहिले. रिलायन्स इंडस्ट्रीज तिसऱ्या स्थानावर, कोल इंडिया चौथ्या तर पाचव्या स्थानावर आयटीसी लिमिटेड आहे.
अक्षय्य ऊर्जेवर आधारित ‘इंडिया टेक’द्वारे पुण्यात परिषद
तंत्रज्ञान अद्ययावतीकरण उद्योगाला दोन दशकांपासून वाहिलेली संघटना ‘इंडिया टेक फाऊंडेशन’ने अक्षय्य ऊर्जेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शन ‘रिन्यूटेक इंडिया २०१३’चे येत्या १६ ते १८ मेदरम्यान चिंचवड, पुणे येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन अ‍ॅण्ड कन्व्हेंशन सेंटर येथे आयोजन केले आहे. भारत सरकारच्या नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या सहयोगाने आयोजित यंदाचे हे प्रदर्शन व परिषदेचे सहावे पर्व असून, सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया, विंड एनर्जी असोसिएशन ऑफ इंडिया आणि वर्ल्ड बायो एनर्जी असोसिएशन आदी संघटनांनी आयोजनात हातभार लावला आहे.  दोन दिवसांची परिषद आणि तीन दिवसांचे प्रदर्शन असे स्वरूप असलेल्या ‘रिन्यूटेक इंडिया २०१३’चा मुख्य भर हा ‘१२ व्या पंचवार्षिक योजनेतून अतिरिक्त ३०,००० मेगाव्ॉटची स्थापित क्षमता अक्षय्य ऊर्जा स्रोतातून कशी मिळविता येईल?’ या विषयावर केंद्रित असेल.