News Flash

‘टीसीएस’ १३ डिसेंबरला आजमावणार मिस्त्रींविरोधात भागधारकांचा कौल!

टाटा सन्सने मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून २४ ऑक्टोबरला तडकाफडकी दूर केले.

टाटा सन्सच्या संचालक मंडळाला मिस्त्री यांनी पत्र लिहिले आहे

उचलबांगडी केले गेलेले अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि टाटा सन्समधील संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने मिस्त्री यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तबासाठी आपल्या भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा येत्या १३ डिसेंबरला बोलावत असल्याचे जाहीर केले आहे. टाटा समूहातील या कारणासाठी सभा बोलावणारी ही पहिलीच कंपनी असून, टाटा केमिकल्स आणि इंडियन हॉटेल्स कंपनी लि. या अन्य कंपन्यांकडूनही असेच पाऊल टाकले जाणे अपेक्षित आहे.

टीसीएस ही टाटा समूहातील अग्रणी कंपनी असून, गेल्या आठवडय़ात टाटा सन्सने विशेष अधिकार वापरून सायरस मिस्त्री यांना या कंपनीच्या अध्यक्षपदावरून दूर करून, त्यांच्या जागी इशात हुसैन यांची हंगामी नियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले. याच निर्णयावर भागधारकांच्या मंजुरीची मोहोर उमटविण्यासाठी १३ डिसेंबरला या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या तारखेविषयी निर्णय घेण्यासाठी टीसीएसच्या संचालक मंडळाची गुरुवारी मुंबईत बैठक झाली, परंतु संचालकपदी कायम असलेल्या मिस्त्री यांनी या बैठकीकडे पाठ फिरविणे पसंत केले.

टाटा सन्सने मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून २४ ऑक्टोबरला तडकाफडकी दूर केले. तरी ते या उद्योगसमूहातील शेअर बाजारात सूचिबद्ध अनेक कंपन्यांच्या अध्यक्षपदी अथवा संचालकपदी कायम होते. तेथूनही त्यांच्या हकालपट्टीसाठी टाटा सन्सने टीसीएसप्रमाणेच टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स आणि इंडियन हॉटेल्स या कंपन्यांना भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याचे निर्देश दिले आहेत.

यापैकी इंडियन हॉटेल्सच्या स्वतंत्र संचालकांनी मिस्त्री यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत त्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे मिस्त्री यांचे पाठीराखे असलेल्यांवर, विशेषत: समूहातील तीन कंपन्यांमध्ये स्वतंत्र संचालक असलेल्या नसली वाडिया यांच्याही हकालपट्टीसाठी टाटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 12:10 am

Web Title: tcs calls shareholder meet on december 13 to oust cyrus mistry from board
Next Stories
1 टाटा कंपन्यांच्या बैठकांना सायरस मिस्त्री यांची दांडी!
2 बँकांकडे वाढता निधी ओघ; मात्र ठेवींदाराच्या व्याजलाभात घट!
3 सेन्सेक्स घसरण सलग चौथ्या सत्रात कायम
Just Now!
X