इन्फोसिसपाठोपाठ टीसीएसनेही (टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस) गेल्या तिमाहीत घसघशीत नफ्यातील झेप नोंदविली आहे. टाटा समूहातील या कंपनीने जानेवारी – मार्च २०१४ मध्ये ४८.२ टक्के वाढ राखत निव्वळ नफा ५,३५७.६० कोटी रुपयांवर नेला आहे. कंपनीच्या महसुलातही यंदा ३१.२ टक्के वाढ झाली आहे.
आर्थिक निष्कर्षांच्या यंदाच्या हंगामाचा शुभारंभ करताना इन्फोसिसने गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत विश्लेषकांच्या अंदाजापुढील कामगिरी बजावत महसूल वाढीचा वेगही बऱ्यापैकी पकडला आहे. असे असताना देशातील पहिल्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसनेही हे सूत्र कायम ठेवले.
टीसीएसचा एकूण २०१३-१४ मधील निव्वळ नफा ३७.६९ टक्क्यांनी वधारून १९,१६३.८० कोटी रुपये झाला आहे. तर याच कालावधीतील महसूल २९.८७ टक्क्यांनी वधारून ८१,८०९ कोटी रुपये झाला आहे.
कंपनीने वर्षभरापूर्वीच्या ३,६१५.६४ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत ५,३५७.६० कोटी रुपये निव्वळ नफा कमाविला आहे, तर महसूलदेखील मार्च २०१३ अखेरच्या १६,४३०.०९ कोटी रुपयांपेक्षा यंदा २१,५५१.०९ कोटी रुपये झाला आहे.
अमेरिकेतील व्यवसायाबरोबरच कंपनीने केलेल्या युरोपातील विस्तारामुळे यंदा लक्षणीय यश प्राप्त झाल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. कंपनीची धोरणात्मक गुंतवणूक आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमधील गुंतवणुकीने ही किमया साधता आली, असेही ते म्हणाले.

५५ हजार कर्मचारी भरतीचा मनोदय
गेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीच्या मनुष्यबळ संख्येत ९,७५१ ची भर पडली आहे. तर एकूण २०१३-१४ आर्थिक वर्षांत २४,२६८ कर्मचारी वाढले आहेत. यामुळे कंपनीतील एकूण कर्मचारी संख्या आता ३,००,४६४ झाली आहे. मुंबईस्थित मुख्यालय असलेल्या टीसीएसने चालू आर्थिक वर्षांत ५५ हजार कर्मचारी भरती करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. कंपनी १० ते १४ टक्के पगारवाढ विद्यमान आर्थिक वर्षांत लागू करेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

इन्फी कर्मचाऱ्यांना पगारवाढ
गेल्या वर्षभरात ३९,९८५ कर्मचारी जोडणाऱ्या इन्फोसिसने समूहात ७ टक्क्यांपर्यंतची पगारवाढ जाहीर केली आहे. यानुसार कंपनीच्या १.६० लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१४ पासूनच वेतनवाढ मिळणार आहे. पैकी ६ ते ७ टक्के पगारवाढ ही कंपनीच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना तर भारताबाहेरील कर्मचाऱ्यांना १ ते २ टक्के वेतनवाढ मिळेल.