News Flash

‘टीसीएस’मधील कर्मचारी कपातीला वादंगाचे वळण

देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस (टीसीएस) नव्या वर्षांतच मोठय़ा प्रमाणातील संभाव्य कर्मचारी कपातीमुळे चर्चेत आली आहे.

| January 6, 2015 01:20 am

देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस (टीसीएस) नव्या वर्षांतच मोठय़ा प्रमाणातील संभाव्य कर्मचारी कपातीमुळे चर्चेत आली आहे.
टाटा समूहातील या कंपनीने चांगले काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येईल, असे नमूद केले असले तरी मोठय़ा संख्येने कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
कंपनीच्या ताफ्यात सप्टेंबर २०१४ अखेर पटावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३.१० लाखांहून अधिक आहे. पैकी २५ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या वृत्ताने कंपनी अचानक चर्चेत आली आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीतील निकालांचा हंगाम चालू आठवडय़ातच आहे. देशातील दुसरी मोठी कंपनी इन्फोसिस येत्या शुक्रवारी, ९ जानेवारी रोजी वित्तीय निष्कर्ष सर्वप्रथम सादर करेल. टीसीएसच्या निकालाचीही प्रतीक्षा असताना नव्या चर्चेत कंपनी घेरली गेली आहे.
एक ते दीड टक्के कर्मचारी कपातीची कुऱ्हाड चालविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कंपनीच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर (फेसबुक) ‘आम्ही नोकर कपातीच्या विरोधात आहोत’ असे ‘पोस्ट’ टाकण्यात आले आहेत. तर काहींनी त्यावर आपले राजीनामापत्रदेखील नमूद केले आहे. ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज’ला तूर्त ९,००० हून अधिक ‘लाइक्स’ आहेत. या व्यासपीठावरील कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने कंपनी मध्य स्तरावरील काही व्यक्ती बाजूला सारत असल्याचे म्हटले आहे. कंपनीत याबाबतची पारदर्शकता नसल्याचे नमूद करीत सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा एका कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे.
‘क्रिसिल’ या वित्तसेवा कंपनीच्या अंदाजानुसार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी भरती येत्या चार वर्षांत ५० टक्क्य़ांनी कमी होईल. १०० अब्ज डॉलरच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगात तूर्त ३० लाख रोजगार आहेत. या क्षेत्रातील कंपन्यांना मिळणाऱ्या महसुलापैकी ८० टक्के रक्कम ही अमेरिका आदी विकसित देशांकडून येते.

‘नासकॉम’कडूनही दखल
टीसीएसमधील नव्या चर्चा-गदारोळाची दखल माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे व्यासपीठ असलेल्या ‘नासकॉम’नेही घेतली आहे. कर्मचारी कपातीच्या संभाव्यतेनंतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची संघटना टीसीएसच्या संपर्कात असून निश्चित माहिती मागविली जाईल. सध्या एकूणच आयटी उद्योगाला मोठय़ा संकटाचा सामना करावा लागत असल्याचे नासकॉमचेही निरीक्षण आहे.

‘टीसीएस’च्या ताफ्यात सप्टेंबर २०१४ अखेर पटावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३.१० लाखांहून अधिक आहे. पैकी २५ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या वृत्ताने कंपनी  चर्चेत आली आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2015 1:20 am

Web Title: tcs job cuts spur legal threats
Next Stories
1 व्यवसाय करताना भीती अन् झुकते मापही नको;
2 नफेखोरीमुळे निर्देशांकांची महत्त्वाच्या पातळ्यांवरून घसरण
3 अ‍ॅक्सिस कॅपिटलमधून नीलेश शाह यांचा पदत्याग
Just Now!
X