टाटा समूहातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस) अमेरिकेत १०,००० कर्मचारी भरती करणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी शुक्ऱवारी मुंबईत दिली.

टीसीएसची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी मुंबईत झाली. यावेळी ते भागधारकांना संबोधित करत होते. कंपनीचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथ हेही यावेळी उपस्थित होते. टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणामुळे कंपनीच्या पाश्चिमात्य देशातील व्यवसायावर कोणताही विपरित परिणाम पडला नसल्याचा दावा यावेळी चंद्रशेखरन यांनी केला.

कंपनीसाठी व्यवसायस्थिती पूर्वीप्रमाणेच असल्याचे नमूद करत त्यांनी भागधारकांना निर्धास्त केले. अमेरिकेप्रमाणेच कंपनीच्या अन्य भागातही कंपनी नोकरभरती आगामी कालावधीत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.

एकटय़ा अमेरिकेत १०,०००  नोकरभरती करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. विदेशी बाजारात कंपनीने गेल्या वित्तीय वर्षांत ११,५०० कर्मचारी भरती केल्याची माहिती गोपीनाथन यांनी यावेळी दिली.