टाटा समूहातील ‘ब्ल्यू आय’च्या नफ्यात ७३ टक्के वाढ; बँक व वित्त क्षेत्रातून अधिक महसूल

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महसुली उत्पन्नात देशात सर्वात मोठय़ा असलेल्या टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस) नेही मार्च २०१६ अखेर संपलेल्या तिमाहीत भक्कम वाढीव नफ्याची कामगिरी बजाविली आहे. टाटा समूहातील या ‘ब्ल्यू आय’ आयटी कंपनीने जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान ६,४१३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमाविला असून वार्षिक तुलनेत तो तब्बल ७२.७ टक्क्यांनी अधिक आहे.

भांडवली बाजारातही बाजारमूल्याबाबत सेन्सेक्समध्ये अव्वल स्थान राखणाऱ्या टीसीएसने नुकत्याच संपलेल्या २०१५-१६ या वित्त वर्षांतील चौथ्या तिमाहीत २८,४४९ कोटी रुपयांचा महसूल मिळविला असून तो वार्षिक तुलनेत १७.५ टक्के अधिक आहे.

व्यवसायात १५.५ टक्के हिस्सा राखणाऱ्या डिजिटल मंचाद्वारे कंपनीला २.३ अब्ज डॉलरचा महसूल मिळविता आला आहे. या विभागासाठी कंपनी २५ कोटी डॉलरची गुंतवणूक करत असल्याचेही जाहीर करण्यात आले.

संपूर्ण २०१५-१६ आर्थिक वर्षांत कंपनीला २४,२९२ कोटी रुपयांचा नफा (वाढ २२.४%) तर महसूल १,०८,६४६ कोटी रुपये (वाढ १४.८%) मिळाला आहे.

चौथ्या तिमाहीत कंपनीने २२,५७६ कर्मचारी जोडत एकूण संख्या ३,५३,८४३ पर्यंत नेली आहे. एकूण वर्षांत कंपनीत नवे ९० हजार कर्मचारी रुजू झाले आहेत. वार्षिक महसुलाचा एक अब्ज डॉलरचा अनोखा टप्पा ओलांडणाऱ्या टीसीएसने सर्वाधिक व्यवसाय बँक व वित्त सेवा क्षेत्र व उत्तर अमेरिकेतून मिळविला आहे.

गेल्या शुक्रवारी देशातील दुसरी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसनेही वाढीव नफ्याचे तसेच महसुली उत्पन्नाचे वित्तीय निष्कर्ष जाहीर केले होते. कंपनीचे समूहाबाहेरील पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी यानिमित्ताने कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच समभागाच्या बक्षिसीही जाहीर केली होती. जानेवारी ते मार्च २०१६ या चौथ्या तिमाहीमध्ये इन्फोसिसचा एकत्रित निव्वळ नफा ३.८ टक्क्यांनी वाढून ३५९७ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. याच काळात कंपनीची महसुली वाढ ही १६,५५० कोटी रुपये म्हणजे ४.१ टक्के अशी समाधानकारक आहे. उल्लेखनीय म्हणजे कंपनीचा डॉलर रुपातील महसूलही १.६ टक्क्यांनी या तिमाहीत वाढला आहे.  आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी इन्फोसिसने ११.५ टक्के ते १३.५ टक्के महसुली वाढीचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. डॉलर रूपातील महसुलीवाढीचा दरही इन्फोसिसने एकूण उद्योगाच्या अपेक्षापेक्षा सरस ११.८ टक्के ते १३.८ टक्के असा अंदाजला आहे.

बँक व वित्त सेवा, किरकोळ व्यापार, निर्मिती क्षेत्रातील आमच्या ग्राहक कंपन्यांच्या जोरावर कंपनीला यंदा लक्षणीय यश प्राप्त करता आले. कंपनीचा डिजिटल विभागावरील भर चालू आर्थिक वर्षांतही कायम असेल. या क्षेत्रात नवीन उत्पादनेही सादर केली जातील.

– एन. चंद्रशेखरन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, टीसीएस.