News Flash

टीसीएसची ऐतिहासिक ‘१०० अब्जावधी’ झेप

टीसीएसने आपले वित्तीय कामगिरीचे निष्कर्ष गुरुवारी सायंकाळी जाहीर केले.

‘टीसीएस’चे मुख्याधिकारी राजेश गोपीनाथ यांच्यासह टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन

बाजार भांडवल अभूतपूर्व टप्प्याच्या वेशीवर

मुंबई : सरलेल्या जानेवारी-मार्च २०१८ तिमाहीत अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी करीत ४.४ टक्क्यांच्या घरात निव्वळ नफा कमावतानाच, आगामी आर्थिक वर्षांत महसुली वाढीचे उत्तम संकेत देणाऱ्या टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)च्या समभागाने शुक्रवारच्या भांडवली बाजारातील मलूल व्यवहारात ७ टक्क्यांनी झेप घेतली. परिणामी टीसीएसचे बाजार मूल्य १०० अब्ज अमेरिकी डॉलरच्या वेशीवर अर्थात साडेसहा लाखांहून अधिक पातळीवर पोहोचले. असा टप्पा गाठणारी ती भारताच्या बाजारात सूचिबद्ध पहिलीच कंपनीच असेल.

टाटा समूहातील या ध्वजाधारी कंपनी – टीसीएसने आपले वित्तीय कामगिरीचे निष्कर्ष गुरुवारी सायंकाळी जाहीर केले. देशातील सर्वात मोठय़ा सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार कंपनीने मार्च तिमाहीत ६,९०४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे स्पष्ट केले. कंपनीने आपल्या भागधारकांना एकास एक बक्षीस समभाग आणि प्रति समभाग २९ रुपयांचा लाभांशही जाहीर करून, वर्षभरात लाभांशापोटी नजराणा प्रत्येक समभागामागे ५० रुपयांवर नेला आहे. याचे सकारात्मक परिणाम समभागाच्या शुक्रवारच्या व्यवहारात उमटले.

शुक्रवारच्या व्यवहारात टीसीएसच्या समभागाने ७.२५ टक्क्यांची उसळी घेत, ३,४२२.३५ रुपये अशी सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर बीएसईवर ६.९८ टक्क्यांच्या सरशीसह हा समभाग ३,४०२.४५ पातळीवर स्थिरावला. बाजारातील हा सर्वाधिक व्यवहार झालेला समभाग ठरला.

टीसीएसच्या समभागातील या दमदार तेजीने कंपनीचे बाजार भांडवल ४१,३००.९२ कोटी रुपयांनी वाढून ६,५२,०८२.९२ कोटी रुपयांवर गेले. रुपयाचे प्रति डॉलर ६५.७८ रुपयांचे विनिमय मूल्य लक्षात घेतल्यास, टीसीएसचे बाजार भांडवल ९८.८ अमेरिकी डॉलर इतके होते. म्हणजे ऐतिहासिक १०० अब्ज अमेरिकी डॉलरचे बाजार भांडवलाचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी टीसीएस केवळ ७,९१७.०८ कोटींनी दूर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:01 am

Web Title: tcs set to become first indian company with 100 billion dollars market cap
Next Stories
1 टंचाईनंतर आता अहोरात्र नोटाछपाई!
2 सीजी कॉर्प ग्लोबलचा भारतातील व्यवसाय विस्तार
3 जेएसडब्ल्यूची कच्च्या पोलाद निर्मितीबाबत विक्रमाची नोंद
Just Now!
X