मुंबई : देशातील सर्वात मोठय़ा माहिती तंत्रज्ञान कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)’ने तिच्या भागधारकांना दुसऱ्या अंतरिम लाभांशांसह विशेष लाभांशही देऊ केला आहे. टाटा समूहातील कंपनीने जुलै ते सप्टेंबर तिमाहीत मात्र निव्वळ नफ्यात अवघी २ टक्के वाढीची कामगिरी साधली आहे.

दुसऱ्या तिमाहीच्या निकाल हंगामाची सुरुवात गुरुवारी टीसीएसच्या निकालाने झाली. कंपनीच्या  संचालक मंडळाने प्रति समभाग ५ रुपये दुसरा अंतरिम लाभांश तसेच प्रति समभाग ४० रुपये विशेष लाभांशाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

टीसीएसचे जुलै ते सप्टेंबर २०१९ या आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष गुरुवारी भांडवली बाजाराचे व्यवहार संपुष्टात आल्यानंतर जाहीर झाले. कंपनीने तिमाहीत १.८ टक्के वाढीसह ८,०४२ कोटी रुपये नफा नोंदविला आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीत कंपनीला ७,९०१ कोटी रुपये नफा झाला होता.

कंपनीच्या महसुलात दुसऱ्या तिमाहीत ५.८ टक्के वाढ होऊन तो ३८,९७७ कोटी रुपये झाला आहे. तर एकूण परिचालन उत्पन्न ४.२० टक्के घसरून ९,३६१ कोटींवर येऊन ठेपले आहे. कंपनीत गेल्या तिमाहीत १४,०९७ कर्मचारी रुजू झाले आहेत. ३० सप्टेंबरअखेर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ४.५० लाखांवर आहे. कंपनीतील कर्मचारी गळतीचे प्रमाण ११.६० टक्के राहिले आहे.