सेन्सेक्स ४०,५०० तर, निफ्टी १२ हजारानजीक

आठवडय़ाची सुरुवात निराशाजनक करणाऱ्या भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक मंगळवारी मात्र अर्ध्या टक्क्यापर्यंत वधारले. बँकांसह दूरसंचार कंपन्यांच्या समभागांकरिता गुंतवणूकदारांची मागणी राहिली. त्यापायी दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सकारात्मक कल  दिसून आला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १८५.५१ अंश वाढीसह ४०,४६९.७० पातळीपर्यंत पोहोचला, तर ५५.६० अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ११,९४०.१० वर स्थिरावला. आठवडय़ाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासून तेजीचे व्यवहार नोंदविणारा मुंबई निर्देशांक मंगळवारच्या व्यवहारात ४०,५०० पर्यंत पोहोचला होता. तर निफ्टीही संपूर्ण व्यवहारात १२ हजारांच्या वेशीतच प्रवास करीत होता.

बँक क्षेत्रात अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक यांचे समभागमूल्य ३.४३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर पॉवरग्रिड, टेक महिंद्र, इन्फोसिस आदी समभागही सेन्सेक्समध्ये तेजीच्या यादीत राहिले. येस बँक, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, हीरो मोटोकॉर्प, टाटा समूहातील टाटा स्टील टीसीएस, टाटा मोटर्स २ टक्क्यांपर्यंत घसरले.

दूरसंचार, बँक, पायाभूत तसेच ऊर्जा क्षेत्रातील समभागांत खरेदीमुळे बाजारात वाढ नोंदली गेल्याचे नमूद करतानाच आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमतीतील उतारही निर्देशांकाच्या पथ्यावर पडल्याचे आशिका स्टॉक ब्रोकिंगच्या समभाग संशोधन विभागाचे अध्यक्ष पारस बोथरा यांनी म्हटले आहे.