जलद तंत्रज्ञानासाठी ओळखले जाणाऱ्या ४जी ध्वनिलहरींचा देशव्यापी परवाना मिळविणाऱ्या एकमेव रिलायन्स जिओने येत्या महिन्यात होणाऱ्या अन्य दूरसंचार लहरींच्या निविदांसाठी अर्ज केल्याने तमाम दूरसंचार क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहेत. धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्ससह अन्य आठ कंपन्यांच्या या स्पर्धेत आता रिलायन्स जिओचे मुख्य प्रवर्तक मुकेश अंबानीदेखील उतरले आहेत.
१८०० मेगाहर्ट्झ आणि ९०० मेगाहर्ट्झसाठी येत्या महिन्यात होणाऱ्या टुजीच्या ध्वनिलहरी परवान्यांची निविदा प्रक्रिया येत्या महिन्यात होत आहे. ११,३०० कोटी रुपयांचा महसुल सरकारजमा होणाऱ्या या प्रक्रियेत बुधवारी एअरटेल, व्होडाफोन, टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस, आयडिया सेल्युलरसह एअरसेल व टेलिव्हिंग्ज (यूनिनॉर) हे छोटे खेळाडूही सहभागी झाले आहेत. मात्र रिलायन्स कम्युनिकेशन्ससह रिलायन्स जिओही यात दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले आहे. दूरसंचार कंपन्यांमध्ये धडकी भरविणाऱ्या या घडामोडींमुळे गुरुवारी शेअर बाजारात सूचिबद्ध दूरसंचार समभाग ७ टक्क्यांपर्यंत खालावले.