भारतीय गुंतवणूकदारांना अमेरिकेतील भांडवली बाजारात समभागसंलग्न म्युच्युअल फंड आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या वेस्टेड फायनान्सने मागील नऊ महिन्यांत गुंतवणूकदारांकडून गोळा केलेल्या निधीत दहा पटीने वाढ साधल्याचे स्पष्ट केले आहे. गुंतवणुकीत भौगोलिक विविधता आणण्याचे भारतीय गुंतवणूकदारांच्या वाढत्या स्वारस्याचे हे द्योतक आहे.

मे २०१९ च्या तुलनेत सरलेल्या मे महिन्यांत वेस्टेड फायनान्सच्या व्यवहारांमध्ये २० टक्के तर गुंतवणूकदारांच्या संख्येत ३० टक्के वृद्धी झाली आहे. अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांच्या संख्येत १० टक्के वृद्धी झाली असून कंपनीने मंचावरील अनिवासी भारतीयांच्या मालमत्तेत २० टक्के वृद्धीदर राखण्याचे उद्दिष्ट राखले आहे.

वेस्टेड फायनान्स हे कॅलिफोर्नियात मुख्यालय असलेले आणि अमेरिकेच्या भांडवली बाजार नियंत्रक ‘एसईसी’ने मान्यता दिलेले नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार असून, त्यांनी ‘सेबी’कडेही नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार म्हणून नोंद केली आहे. वेस्टेडचे मुंबईत कार्यालयाद्वारे अस्तित्व आहे.