विमा क्षेत्रात समन्वयक, समुपदेशक व दलाल या नात्याने भूमिका बजावणाऱ्या भारत री इन्श्युरन्स ब्रोकर्स प्रा. लि. कंपनीला नजीकच्या काळात देशातील मध्यम व बडय़ा उद्योगांकडून दहशतवादी घातपातात होणाऱ्या नुकसानीची आर्थिक भरपाई करणाऱ्या ‘टेरर इन्श्युरन्स’ विमाकवच घेण्याकडे कल वाढणे अपेक्षित आहे. वाहन उद्योग, रसायन, पेट्रो रसायन तसेच औषधी निर्माण क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये या विमा संरक्षणाचा अवलंब आणि उत्सुकता दिसून येत आहे.
विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्यक्ष दहशतवादी कृत्यांसह, दहशत माजविण्यासाठी केल्या जाणाऱ्या घातपाती कारवायांतून घडणाऱ्या नुकसानीचेही संरक्षण देणारी तरतूद असल्याने, ‘भारत री’कडून दिल्या जाणाऱ्या पुनर्विम्याच्या उपाययोजनांमुळे उद्योगक्षेत्रांना अधिक चांगले व व्यापक संरक्षक कवच मिळविता येईल, असे या कंपनीचे संचालक (विशेष प्रकल्प) टी. एल. अरुणाचलम यांनी सांगितले. भारत रीने देशांतर्गत विविध सामान्य विमा क्षेत्रातील कंपन्या आणि पुनर्विमा (रि-इन्श्युरन्स) कंपन्यांसाठी २०१४-१५ आर्थिक वर्षांत २४० कोटी रुपयांचा व्यवसाय (प्रीमियमपोटी उत्पन्न) मिळवून दिला आहे. कंपनीचा ग्राहक वर्ग ६०० छोटय़ा-मोठय़ा उद्योगांपर्यंत विस्तारला आहे. दहशतवादापासून संरक्षण देणाऱ्या विम्यासाठी प्रत्येक १००० रुपयांच्या विमाकवचासाठी अवघे २० पैसे ते २३ पैसे इतके प्रीमियम आकारले जाते. इतक्या अत्यल्प हप्त्यावर मिळणारे संरक्षण खूप लक्षणीय आहे, असे अरुणाचलम यांनी सांगितले. विशेष म्हणजे आपल्या ग्राहकांच्या विमाविषयक दाव्यांचे निवारण व सुयोग्य भरपाई मिळवून देण्याचे काम कंपनीकडून केले जाते.