चेन्नई : जगभरातील वाहनप्रेमींची उत्सुकता शिगेला नेणाऱ्या बहुप्रतिक्षित टेस्ला या विजेवर चालणाऱ्या कारची चाके प्रत्यक्षात २०२० मध्ये भारतातील रस्त्यांना स्पर्श करणार आहे. टेस्लाच्या प्रमुखांनीच अशी ग्वाही  भारत दौऱ्यात दिली.

टेस्लाच्या अद्ययावत व तंत्रस्नेही विद्युत कारबाबत जगभरात उत्सुकता आहे. भारतीय ग्राहकांनााही ती आहेच. चेन्नईच्या ‘मद्रास आयआयटी’च्या विद्यार्थ्यांशी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी शुक्रवारी संवाद साधला. विद्यार्थ्यांकडून अपेक्षेप्रमाणे आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल, टेस्ला २०२० मध्ये नक्की भारतात येईल, या शब्दात त्यांना आश्वासन दिले.

चालू वर्षांतच टेस्ला भारतात आणायला आम्हाला आवडले असते; मात्र तूर्त तरी त्याबाबत आश्वासक वातावरण नाही. परिणामी पुढच्या वर्षी ती नक्की येथे येईल, असे ते म्हणाले.

थेट विदेशी गुंतवणूकविषयक भारताच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करताना इलॉन मस्क यांनी, ही धोरणे टेस्लाच्या वाहनांचे पदार्पण लांबवत असल्याचा ठपका ठेवला.