उद्योगमंत्र्यांकडून सचिव बैठकीत आढावा

मुंबई : राज्यातील उद्योगांना राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीमार्फत स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाने चाचपणी  सुरू केली असून याविषयी चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा व उद्योग विभागाच्या सचिवांची बैठक घेण्यात आली.

गुजरात व कर्नाटक राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगांना २५ ते ३५  टक्के अधिक दराने वीज पुरवठा केला जात आहे. हे दर कमी करण्याची मागणी उद्योजकांनी केली आहे. दरम्यान, इतर राज्यातील वीज दरांतील तफावत, महाराष्ट्रात वीजपुरवठय़ातील त्रुटी, तांत्रिक अडचणी काय आहेत, आदी बाबींचा सखोल अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी या बैठकीत दिले. ऊर्जा सचिव असिम गुप्ता, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन या बैठकीला उपस्थित होते.

एमआयडीसीने थेट वीज खरेदी करावी, त्यासाठी लागणारा खर्च उचलावा. खरेदी केलेली वीज एमआयडीसीने विकावी. तसेच सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करावा, अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्या. या सर्व पर्यायांची चाचपणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देसाई यांनी दिले आहेत.