चिंताजनक बनलेली चालू खात्यातील वाढती तूट रोखण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्राचाही हातभार लावण्याचा मनोदय नवीन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री डॉ. के. एस. राव यांनी आपल्या मुंबईतील भेटीत व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षांत देशाची वस्त्रोद्योग निर्यात ३५ अब्ज डॉलर तर आगामी आर्थिक वर्षांपर्यंत ५० अब्ज डॉलर नेण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. सध्याच्या अमेरिका, युरोपिय महासंघासह लॅटिन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांवरही लक्ष केंद्रीत करून भारताची वस्त्रोद्योग निर्यात २०१५पर्यंत ५० अब्ज डॉलपर्यंत नेण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. गेल्या आर्थिक वर्षांत देशाची वस्त्रोद्योग निर्यात ३१.७ अब्ज डॉलर झाली असून चालू आर्थिक वर्षांत ती ३५ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.