देशांतर्गत वस्त्रनिर्मात्यांपुढे बांगलादेशातून होणारी अनियंत्रित शुल्कमुक्त निर्यात आणि बांगलादेशातूनच चिनी कापडाचा मागच्या दाराने होणारा प्रवेश ही सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी असून, या संबंधाने सरकारने ताबडतोब तोडगा काढला न गेल्यास, पुढील तीन वर्षांत वस्त्रोद्योगातील १० लाखांच्या रोजगारावर गदा येईल, असा इशारा वस्त्रनिर्मात्यांची संघटना – क्लोदिंग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय)ने दिला आहे.

भारताने बांगलादेशासोबत मुक्त व्यापार करार (एफटीए) केला असून त्याद्वारे त्या देशातून भारतात कोणत्याही प्रकारची कर न भरता कपडे निर्यात केले जाऊ शकतात. याचा फायदा घेत बांगलादेशातील उत्पादक चीनमधून करमुक्त स्वरूपात कापड आयात करतात, त्यांचे रूपांतर वस्त्रप्रावरणांत करून त्याची स्वस्तात भारतात निर्यात करतात. त्यामुळे मागल्या दाराने चिनी कापडाला भारतीय बाजारपेठ मुक्तपणे उपलब्ध झाली आहे, असे सीएमएआयचे अध्यक्ष राहुल मेहता यांनी ही समस्या विशद करताना सांगितले.

बांगलादेशातून भारताची वस्त्र आयात मागील वर्षांच्या तुलनेत ८२ टक्क्यांनी आणि २०१६-१७ च्या तुलनेत १६१ टक्क्यांनी वाढली आहे आणि आता ती ३६५ दशलक्ष अमेरिकी डॉलपर्यंत पोहोचली आहे. आयातीत अशीच वेगाने वाढ सुरू राहिल्यास २०२४-२५ पर्यंत बांगलादेशातून कपडय़ांची आयात ३.६ अब्ज अमेरिकी डॉलपर्यंत पोहोचेल, असा अंदाज मेहता यांनी व्यक्त केला. विरोधाभास असा की, भारतातून बांगलादेशात कपडय़ांची निर्यात करायची असल्यास १२५ टक्के इतके शुल्क भरावे लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सीएमएआयने सरकारला या बाबतीत तात्काळ हस्तक्षेप करून, करविषयक विसंगती दूर करून उपायोजना करण्याची विनंती केली आहे. आयातीची वाढ कायम राहिल्यास, देशी वस्त्र निर्मात्यांची उपासमार होऊन या उद्योगातून २०२५ पर्यंत १० लाख रोजगार गमावले जातील, असा इशाराही सरकारला दिला असल्याचे मेहता यांनी सांगितले. देशांतर्गत वस्त्रप्रावरणांची बाजारपेठ ही  सुमारे २,५०,००० कोटी रुपयांची असून त्यापैकी ७० टक्के म्हणजे १७५,७५० कोटी रुपये अशी असंघटित क्षेत्राने व्यापली आहे. या असंघटित क्षेत्रात बांगलादेशातून येणाऱ्या स्वस्त चिनी कापडाचा बोलबाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदाच्या अर्थसंकल्पातून या संबंधाने कोणतीच तरतूद केली गेली नसल्याबद्दल वस्त्रनिर्मात्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

मुंबईत येत्या १५ जुलैपासून चार दिवसांच्या ६९ व्या राष्ट्रीय वस्त्र मेळाव्यानिमित्त देशभरातून वस्त्रनिर्माते एकत्र येत असल्याची राहुल मेहता यांनी माहिती दिली. देशातील हा आजवर होत असलेला सर्वात मोठा व्यापार मेळावा असून, गोरेगावस्थित मुंबई प्रदर्शन संकुलातील सर्व दालने म्हणजे तब्बल सात लाख चौरस फूट क्षेत्रफळ व्यापणारे वस्त्रप्रदर्शनही या निमित्ताने होणार आहे. देशभरातून ८८२ प्रदर्शक त्यांच्या १०६२ ब्रँड्सचे यात प्रदर्शन करतील. सुमारे ५० हजार विक्रेते प्रदर्शनाला येणे अपेक्षित आहे.