दसरा, दिवाळीसारख्या हंगामात सूट-सवलतींची मात्रा कायम ठेवूनही देशातील वाहन उद्योगाला गेल्या वर्षांत दशकातील पहिल्या घसरणीला सामोरे जावे लागले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१३ यादरम्यान भारतातील प्रवासी कार विक्री ९.५९ टक्क्यांनी खालावली असून गेल्या ११ वर्षांत असे प्रथमच घडले आहे.
वाहन उत्पादक कंपन्यांची संघटना असलेल्या ‘सियाम’ने जारी केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार प्रवासी वाहन विक्री २०१३ मध्ये १८.०७ लाख झाली आहे. आधीच्या वर्षांत ती १९.९८ लाख होती. २००२ नंतर प्रथमच गेल्या वर्षांत घट नोंदली गेली आहे.
देशातील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा हा परिणाम असल्याचे याबाबत संघटनेचे महासंचालक विष्णू माथूर यांनी म्हटले आहे. वाढती महागाई, इंधनाच्या किमती तसेच बँका, वित्तसंस्थांचे चढे व्याजदर हेही प्रवासी वाहनांच्या घसरत्या विक्रीला तेवढेच जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.
गेल्या १७ महिन्यांत ऑक्टोबर २०१२, ऑगस्ट व सप्टेंबर २०१३ या तीन महिन्यांतच केवळ कार विक्री वाढल्याची नोंद झाली आहे. विद्यमान आर्थिक वर्षांत आतापर्यंत (एप्रिल ते डिसेंबर २०१३) या उद्योगामार्फत २२ नवी वाहने सादर करण्यात आली.
२०१३ च्या शेवटच्या, डिसेंबरमध्येही देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री ४.५२ टक्क्यांनी घसरली असून ती १,३२,५६१ झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती किरकोळ अधिक, १,३८,८३५ होती. मारुतीसह अनेक आघाडीच्या कंपन्यांना एकूण विक्रीत या महिन्यात घसरणीचा सामना करावा लागला.
चीनची मात्र भरीव कामगिरी; दुहेरी आकडय़ातील वाढ
भारतीय वाहन उद्योगाचा प्रवास नकारात्मक नोंदला जात असतानाच शेजारच्या चीनमध्ये मात्र या क्षेत्राने दुहेरी आकडय़ातील भक्कम वाढ नोंदविली आहे. हा देश गेली दोन वर्षे सातत्याने बिकट अवस्थेत होता. २०१३ मध्ये चीनमधील वाहन विक्री तब्बल १३.८७ टक्क्यांनी उंचावली असून ती २.१९ कोटी झाली आहे. गेली सलग दोन वर्षे ५ टक्क्यांहूनही कमी वाढ राखणाऱ्या या देशाने या क्षेत्रात एकटय़ा डिसेंबर २०१३ मध्ये २१ लाख वाहने विकली गेली आहेत. या देशाची निर्यातही गेल्या वर्षांत ७.४६ टक्क्यांनी कमी होऊन ती ९.७७ लाख झाली आहे. विक्रीबाबत चीनमध्ये जपानी कंपन्यांचा प्रवास उमेदीचा राहिला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी चीनने अनेक शहरांमध्ये नव्या वाहन आयातीवर र्निबध लादले होते.