व्यापाऱ्यांच्या महासंघाची जळजळीत प्रतिक्रिया; देशभरातून रोष

दरमहा चारपेक्षा अधिक रोखीच्या उलाढालींवर मोठी शुल्कवसुली बडय़ा खासगी बँकांकडून केली जाणे हा आर्थिक दहशतीचाच प्रकार असल्याची खरमरीत टीका किरकोळ व्यापाऱ्यांचा महासंघ – कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने गुरुवारी व्यक्त केली.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने बुधवार १ मार्चपासून बँकेच्या शाखांमध्ये रोखीतील उलाढाली महिन्यांतून चार आणि एकंदर दोन लाख रुपयांपर्यंत अशी मर्यादा आणली आहे. त्या मर्यादेपल्याड व्यवहार सशुल्क करतानाच, त्यावर सध्याच्या ५० रुपयांच्या तुलनेत तिपटीने वाढ केली आहे. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस या दोन बडय़ा बँकांनीही नवीन शुल्कवाढ लागू केली आहे.

आपल्याच बचत खात्यात असणाऱ्या पैशांचा महिन्यातून चारपेक्षा अधिक वेळा व्यवहार केल्यास त्यावर बँकांनी शुल्कवसुली करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. खातेदारांना ही एक प्रकारची आर्थिक दहशत घालणारी बाब आहे. लोकांवर बंदुकीचा नेम धरून त्यांना रोकडरहित व डिजिटल व्यवहारासाठी प्रवृत्त करण्याची ही पद्धत चुकीचीच आहे, अशा शब्दात कॅटचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी बँकांच्या नवीन शुल्करचनेचा समाचार घेतला.

जर अधिकाधिक डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहित करायचे असेल, तर त्यासाठी आकारले जाणारे शुल्कही कमी व्हायला हवे. सरकारने या खर्चाची भरपाई बँकांना द्यायला हवी. रोखीची उलाढाल खर्चीक करण्यापेक्षा अधिकाधिक रोकडरहित व्यवहार हे लाभकारक कसे बनतील, याकडे लक्ष दिले जायला हवे, असेही खंडेलवाल यांनी सूचित केले.

या उलट तीन बडय़ा खासगी बँकांनी आपल्या खातेदारांना महिन्यांतून चारदा आणि एकत्रित मिळून २ लाख रुपये मर्यादेपर्यंत खात्यातून रोख नि:शुल्क स्वरूपात काढण्याला ग्राहकांना वाव ठेवला आहे. दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम काढली वा भरली गेल्यास, तर त्या महिन्यातील एकत्रित रकमेवर प्रत्येक हजार रुपयामागे ५ रुपये अथवा १५० रुपये (अधिक कर) यापैकी जी जास्त असेल तेवढी शुल्कवसुली केली जाईल. उदाहरणार्थ, एका महिन्यांत पाच उलाढालींतून अडीच लाख रुपये रोख बँकेत भरले गेल्यास, त्यावर हजारामागे पाच रुपये याप्रमाणे १,२५० रुपये शुल्कवसुली बँक करेल.

पटेलांच्या पदग्रहणापूर्वीच २,०००च्या नोटांची छपाई

इंदूर: ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी, पंधरवडापूर्वीच २,००० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरू झाली होती, अशी माहिती आता पुढे आली आहे. तर प्रत्यक्ष जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बाद करण्याच्या अडीच महिने आधी २,००० रुपयांच्या नोटा छापून घेतल्या होत्या, असेही स्पष्ट झाले आहे. चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या नोटांची छपाई जुलैपासूनच बंद करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

मध्य प्रदेशच्या नीमच जिल्हय़ातील निवासी चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाकरिता हे उत्तर मिळाले आहे. याबाबत भारतीय रिझव्‍‌र्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड या रिझव्‍‌र्ह बँकेच्या नोटा छपाई करणाऱ्या उपकंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.