मकरंद जोशी

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगातील घडामोडी व त्यांचा या क्षेत्रावरील परिणामाचा ऊहापोह या पाक्षिक सदरातून मंगळवारी केला जाईल.

सामान्यपणे जेव्हा लघु किंवा मध्यम उद्योजकाला हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा त्याचं उत्तर हे जमीन, स्थावर मालमत्ता, सोने, चांदी, मुदत ठेवी, रोखे किंवा दुसऱ्यांच्या कंपनीचे समभाग (शेअर्स) असं काहीसं असेल. पण जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीसंबंधी माहिती मिळवली की असं दिसत की त्यांची सर्वात जास्त संपत्ती त्याच्या स्वत:च्या कंपनीच्या भागभांडवलाच्या बाजारमूल्यातून येते!

तुमच्या कंपनीचे बाजारमूल्य काय आहे?

सर्वसाधारणपणे लघु किंवा मध्यम उद्योजक आपल्या उद्योगावर आपल्या अपत्याप्रमाणे प्रेम करतो. आणि प्रेम म्हटलं की मालकी हक्क (POSSESSIVENESS), आसक्ती (ATTACHMENT) ही आलीच.  परंतु जोपर्यंत एखादी एखादी वस्तू बाजारात जात नाही तिथंपर्यंत त्याची खरी किंमत कळत नाही. एखाद्या मालमत्तेसाठीचा बाजार असेल तो विकसित असेल तर त्या मालमत्तेची योग्य किंमत मिळेल. शिवाय जोपर्यंत उद्योजक आपल्या कंपनीचे भागभांडवल गुंतवणूकदारांमधे वितरीत करणार नाही तिथपर्यंत त्या भागभांडवलाचे बाजारमूल्य त्याला कळणार नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला उद्योजकाची सर्वात मोठी मालमत्ता म्हणजे त्याच्या कंपनीचे त्याच्या स्वत:च्या मालकीचे भागभांडवल, हे झाकलं माणिक राहतं. त्याची खरी किंमत उद्योजकालासुद्धा नीट कळत नाही.

उद्योगांमध्ये भागभांडवलाचे महत्त्व काय?

कुठल्याही उद्योगामध्ये भागभांडवलाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. किंबहुना कुठलाही उद्योगाची उलाढाल (TURNOVER) ही त्या उद्योगात गुंतवल्या जाणाऱ्या पैशावर अवलंबून आहे. उद्योगासाठी लागणारे पैसे हे भागभांडवल आणि कर्ज या दोन माध्यमातून येतात. शिवाय उद्योगाला कर्ज किती मिळणार हे त्या उद्योगात गुंतवलेल्या भागभांडवलावरदेखील अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत नादरी व दिवाळखोरी कायद्यांतर्गत अनेक उद्योगांवर कारवाई झाली. एखादा उद्योग दिवाळखोर का होतो हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यावर आपण भविष्यात बोलूच, परंतु उद्योगात कर्जाचे प्रमाण जास्त आणि भागभांडवल कमी असेल तर त्या उद्योगाला दिवाळखोरीची भीती जास्त असते.

लघु आणि मध्यम उद्योजकाच्या भागभांडवलासाठी बाजार आहे का?

या प्रश्नाचं उत्तर सुदैवाने सकारात्मक आहे. लघु आणि मध्यम उद्योग वाढण्यासाठी त्यांना पुरेसे भागभांडवल पुरवणे हे भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्या अनुसार २०१२ पासून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही प्रमुख बाजारांतर्गत लघु आणि मध्यम उद्योजकाच्या भागभांडवलासाठी बाजार आहे. आजमितीस साधारण ४००-५०० लघु आणि मध्यम उद्योजकांनी आपल्या कंपनीचे समभाग या बाजारात सूचिबद्ध (LIST) केले आहेत. या लघु आणि मध्यम उद्योजकांनी आपल्या कंपनीची प्रारंभिक खुली भागविक्री (IPO) प्रक्रियेद्वारे भांडवलाची उभारणी करत कंपनीला सूचिबद्ध केले आहे. एकटय़ा मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांचं  बाजारमूल्य साधारण ११,०००-१२,०००  कोटी रुपये आहे. या बाजार मूल्यातील साधारण ७०-७४ % समभाग या कंपनीच्या प्रवर्तकांकडे असल्यास त्या प्रवर्तकांची संपत्ती साधारण ८,००० कोटी रुपये होते. आणि गुंतवणूकदार ४,००० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.

भारतात साधारण १० लाख कंपनी अस्तित्वात आहेत आणि खूप कमी उद्योजकांनी आपल्या कंपनीची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया राबविली आहे. जास्तीत  जास्त  लघु आणि मध्यम उद्योजकांनी आपल्या कंपनीने या माध्यमातून कंपनीचे बाजारमूल्य वाढवावे. या प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती आपण पुढल्या काही लेखात घेऊ.

(लेखक कंपनी सचिव आहेत.)

makarandjoshi@mmjc.in