सकारात्मक मान्सून अंदाजाला महागाई, उत्पादन दराचाही प्रतिसाद

नव्या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच भारतीय अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण करणाऱ्या तिहेरी सुवार्तेचा मंगळवाराने प्रत्यय दिला. यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याचे वेधशाळेने स्पष्ट केल्यानंतर देशातील ग्राहक किमतींवर आधारीत महागाई दर सावरण्याबरोबरच औद्योगिक उत्पादनाचा दरही उंचावत असल्याचे मंगळवारच्या आकडेवारीने पुढे आणले. मार्चमधील ५ टक्क्य़ांखाली किरकोळ महागाई दराने गेल्या सहा महिन्यातील किमान स्तर राखला आहे. तर सरलेल्या फेब्रुवारीत औद्योगिक उत्पादनांत वाढीचा दर २ टक्के राहिला आहे. चालू आर्थिक वर्षांत देशाचा विकास दर ७.५ टक्के राहील, या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भाकितानेही भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रबळ वाटचालीची ग्वाही दिली आहे.

भाज्या, डाळी तसेच अन्नधान्याच्या अन्य चिजवस्तूंच्या दरातील उतार महागाई दराला त्याच्या सहामाहीच्या तळात घेऊन गेला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित मार्चमधील किरकोळ महागाई दर ४.८३ टक्के नोंदला गेला आहे.

फेब्रवारीतील सुधारित महागाई दर ५.२६ टक्के स्पष्ट करण्यात आला आहे. सप्टेंबर २०१५ मधील ४.४१ टक्क्यांनंतर महागाई दर यंदा प्रथमच कमी झाला आहे. तर वर्षभरापूर्वी मार्च २०१५ मध्ये हा दर ५.१७ टक्के होता. गेल्या वर्षभरात ऑगस्ट २०१५ मध्ये ३.६६ असा सर्वात कमी राहिला आहे.

गेल्या महिन्यात अन्नधान्याचा महागाई दरदेखील कमी होत ५.२१ टक्क्यांवर आला आहे. आधीच्या महिन्यात तो ५.३० टक्के होता. भाज्यांचे दर ०.५४, तेल दर ४.८५ टक्के तर दूध व अन्य पदार्थाचे दर ३.३३ टक्के राहिले आहेत. फळेही (-) १.१० टक्के यंदा स्वस्त झाली आहेत. डाळींचे दर तब्बल ३४.१५ टक्क्यांवर खाली आले आहेत. मार्चमध्ये साखरेचे दर ३.९२ टक्क्यांपर्यंत तर तंबाखूजन्य पदार्थाच्या किमती ८.५१ टक्क्यांइतपत महाग झाले आहेत. त्याचबरोबर अंडीही ६.६८ टक्क्यांपर्यंत महाग झाली आहेत. किरकोळ महागाई निर्देशांकावर आधारित ग्रामीण भागातील महागाई दर मार्चमध्ये ५.७० टक्के तर शहरी भागातील दर ३.९५ टक्के नोंदला आहे.

औद्योगिक उत्पादन दर सकारात्मक २ टक्क्यांवर!

सलग तीन महिने घसरता राहणारा देशाचा औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये वाढत दोन टक्क्यांवर पोहोचला आहे. खनिकर्म, ऊर्जा तसेच ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राच्या कामगिरीच्या जोरावर यंदा प्रथमच निर्मिती क्षेत्राला नकारात्मक स्थितीतून डोके वर काढता आले आहे.

देशाच्या निर्मिती क्षेत्राचे मापन असणारा औद्योगिक उत्पादन निर्देशांक नोव्हेंबर २०१५ पासून सलग तीन महिने नकारात्मक स्थितीत होता. तर तत्पूर्वीच्या, ऑक्टोबर महिन्यात तो ९.९ टक्के असा वर्षभरातील सर्वोच्च स्तरावर होता.

२०१५-१६ या आर्थिक वर्षांतील एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान औद्योगिक उत्पादन दर २.६ टक्के नोंदला गेला आहे. वार्षिक तुलनेत याच कालावधीपेक्षा तो किरकोळ (२.८ टक्के) कमी आहे.

फेब्रुवारी २०१६ मध्ये ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ ९.७ टक्के, निर्मिती क्षेत्राची ०.७ टक्के राहिली आहे. तर खनिकर्म (५ टक्के), ऊर्जा निर्मिती (९.६ टक्के) क्षेत्रानेही वाढ राखली आहे.

‘आयएमएफ’ही आशावादी

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०१६-१७ करिता भारताचा आर्थिक विकास दर ७.५ टक्के अंदाजला असून तो चीनपेक्षा एक टक्के पुढे असेल, असे नमूद केले आहे. उल्लेखनीय म्हणजे जागतिक विकासदराचा नाणेनिधीचा अंदाज ३.४ टक्क्य़ांवरून ३.२ टक्के असा खालावला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या ७.६ टक्क्यांच्या तुलनेत नाणेनिधीचा अंदाज किंचित कमी आहे. भारतातील निर्मिती उद्योगांची स्थिती सुधाराच्या दिशेने असून ग्राहकांच्या वाढत्या क्रयशक्तीच्या जोरावर देशाला वाढीव विकास दर साधता येईल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. २०१७ च्या पहिल्या अर्धवार्षिकात देशाचा महागाई दर ५ टक्के असेल, असेही याबाबतच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यापूर्वी, ऑक्टोबर २०१५ मध्येही चालू आर्थिक वर्षांसाठी भारताचा विकास दर ७.५ टक्के राहील, असे भाकित वर्तविले होते. चीनचा विकास दर ६.९ टक्क्यांवरून ६.५ टक्के अंदाजण्यात आला आहे.