पीटीआय, नवी दिल्ली

करोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्राहकांच्या क्रयशक्तीवर विपरीत परिणाम झाला असून चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच तिमाहीत देशातील स्मार्टफोनची विक्री कमालीची मंदावली आहे.

एप्रिल-जून २०२१ तिमाहीदरम्यान भारतात ३.२४ कोटी स्मार्टफोनची आयात झाली. मात्र वार्षिक तुलनेत त्यात थेट १३ टक्के घसरण झाली आहे. ‘कॅनेलिस’ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने ग्राहकांकडून स्मार्टफोनच्या मागणीत घसरण नोंदली गेली. वर्षभरापूर्वी एप्रिल व मेमध्ये कडक टाळेबंदी असूनही मागणीत ८७ टक्के वाढ नोंदली गेली होती, असे ‘कॅनेलिस’चे विश्लेषक सन्यम चौरसिया यांनी म्हटले आहे.

देशात स्मार्टफोनच्या पसंतीमध्ये शाओमीचे अव्वल स्थान यंदाही कायम आहे. ९५ लाख स्मार्टफोन विक्रीसह या कंपनीने २९ टक्के बाजारहिस्सा राखला आहे. तर सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिमाहीत  ५५ लाख स्मार्टफोन विक्रीसह तिचा बाजारहिस्सा १७ टक्के आहे.

रिअलमीने (तिसऱ्या स्थानावर) यंदा एका क्रमाने आघाडी घेत स्पर्धक ओप्पोला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे. १५ टक्के बाजारहिस्सा असलेल्या रिअलमीचे ४९ लाख फोन तिमाहीत विकले गेले. तर १२ टक्के बाजारहिश्श्यासह ओप्पोने ३८ लाख स्मार्टफोनची विक्री जून  तिमाहीत केली.