‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ म्हणजेच भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांची देशव्यापी संघटनेच्या इतिहासात प्रथमच नवी दिल्लीबाहेर होऊ पाहणाऱ्या वाहन प्रदर्शनाच्या मांदियाळीचे ‘काऊन्टडाऊन’ सुरू झाले आहे. प्रत्यक्षात ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनावरून पहिली नजर (५ फेब्रुवारी) अर्थातच माध्यमांची फिरणार आहे. गेले काही महिने/वर्ष कमी विक्रीच्या फेऱ्यात अडकलेल्या या उद्योगातील धुरिणांनी तत्पूर्वीच तयारी सुरू केली आहे. २०१४ ची निराशाजनक सुरुवात राहिल्याचे जानेवारीतील वाहन विक्रीचे आकडे स्पष्ट होत असतानाच देशातील आघाडीच्या दोन प्रवासी वाहन कंपन्यांनी प्रदर्शनाच्या तोंडावर नवी वाहने सादर करून या क्षेत्रात अस्वस्थता असल्याचे जाणवून दिले.

२०१४ ची सुरुवात निराशाजनक असल्याचे शनिवारपासून स्पष्ट होणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या वाहन विक्रीच्या आकडय़ावरून स्पष्ट होत आहे. देशात प्रत्येक दहा गाडय़ांमागे सात गाडय़ा मारुतीच्या नावावर अशी नोंद असणाऱ्या मारुती सुझुकीनेही गेल्या महिन्यात दुहेरी आकडय़ातील एकूण वाहन विक्रीतील घसरण नोंदविली. कंपनीची निर्यात तर या दरम्यान निम्म्यावर आली. क्रमांक दोनची आणि निर्यातीतील अव्वल अशा मूळच्याकोरियन ह्य़ुंदाई मोटर्सनेही जानेवारीत तब्बल २०.३९ टक्के विक्रीतील घट राखली. देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीतही कंपनीला काही प्रमाणात फटका बसला. प्रवासीबरोबरच अवजड वाहन श्रेणीत एकमेकांच्या कट्टर स्पर्धक टाटा मोटर्स महिंद्र अॅण्ड महिंद्रही वाहन विक्री मंदीच्या फेऱ्यातून यंदा सुटू शकल्या नाहीत.