पूर्वी एखादा शेअर दलाल आर्थिक बाबतीत दिवाळखोर झाला तर इतर दलालांना त्याची झळ लागत असे. कारण त्या सेटलमेंट कालावधीत ज्या ज्या दलालाशी त्याचे व्यवहार झाले असतील ते पूर्ण व्हायचे कसे? म्हणजे एखादा दलाल समजा दहा कोटी रुपये देणे असतानाच नादार झाला तर ज्या ज्या ब्रोकरशी त्याचे व्यवहार झाले असतील तितकी रक्कम त्या ब्रोकरला स्टॉक एक्स्चेंजकडे भरावी लागत असे. मग विशिष्ट ब्रोकरला अशा प्रकारे समजा तीन कोटी रुपये भरावे लागणार असतील व त्याची तेवढी आर्थिक ताकद नसेल तर तो देखील नादार घोषित केला जाईल.
हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे या हेतूने १९९०च्या आसपास ‘ट्रेड गॅरंटी फंड’ बीएसईने सुरू केला. सुरुवातीला स्वतची काही रक्कम घालून नंतर प्रत्येक ब्रोकरकडून त्याच्या उलाढालीवर आधारित अल्पशी रक्कम गोळा करीत आता हा ‘ट्रेड गॅरंटी फंड’ काही हजार कोटी रुपये इतका प्रचंड झाला आहे. त्यामुळे आता जर कुणी दलाल दिवाळखोरीत गेला तर या फंडातून त्याची देणी भागवली जातील व बाजारात आर्थिक पेचप्रसंग निर्माण होऊ दिला जाणार नाही. अर्थात गेली काही वष्रे संगणकीकरणामुळे  सर्व व्यवहार पारदर्शक झाले आहेत तसेच प्रत्येक दलाल करीत असलेल्या व्यवहारांवर देखरेख ठेवण्याची व्यवस्था असून कुणीही दलाल त्याच्या आर्थिक ताकदीपेक्षा जास्त प्रमाणात व्यवहार करू शकणार नाही हे पाहिले जाते.
ही आर्थिक ताकद म्हणजेच त्या दलालाने सुरक्षितता म्हणून स्टॉक एक्सचेंजकडे जी काही रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवली असेल ती! अर्थात हे डिपॉझिट रोख रकमेच्या स्वरूपात असेल किंवा शेअर्सच्या स्वरूपात. ही सीमा ओलांडली गेली की त्या ब्रोकरचे बोल्ट टर्मिनल आपोआप स्थगित होण्याची यंत्रणा बीएसईकडे असते.
आपयीओ बाबत मागील लेखात लिहिले होते. ज्या अर्जदाराला शेअर्सचे वितरण (Allotment) होत नाही त्याला पूर्वी चेकने पसे परत केले जात असत. अर्थात कंपनीकडून चेक रवाना होणे, गुंतवणूकदाराला तो मिळणे, बँकेत जमा व्हायला लागणारा कालावधी यात खूप दिवस जात व पूर्ण महिन्याचे व्याज जायचे. सांप्रत ASBA  म्हणजे Application Supported By Blocked Amount  ही सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे आयपीओ अर्जासोबत चेक न जोडता ज्या बँकेत आपले खाते आहे त्या खात्याचा क्रमांक लिहिला की झाले. तितके पसे बँक खात्यात कुलूपबंद ( block ) केले जातात. शेअर्सचे वितरण झाले की त्याच दिवशी खात्यातून पसे वजा होतात. वितरण झाले नाही तर कुलूप काढले जाते. म्हणजे व्याजाचे नुकसान होत नाही. अशी गुंतवणूकदारांच्या हिताची अनेक पावले सेबीने उचललली आहेत.
मी न सांगता दलालाने माझ्या ट्रेडिंग खात्यात व्यवहार केले (शेअर्स विकले/खरेदी केले) मला कळलेच नाही असे म्हणण्याची आता मुभा नाही. पूर्वी भले हे होत असेल पण आता ट्रेड झाला रे झाला की स्टॉक एक्सचेंज गुंतवणूकदाराला स्वतच्या डेटाबेसमधून एसएमएस पाठवते. त्यामुळे आपण न सांगता दलालाने शेअर्स विकले किंवा खरेदी केले की काही तासात आपल्याला ते कळते. अर्थात अशाप्रसंगी तात्काळ स्टॉक एक्सचेंजकडे तक्रार दाखल करणे ही जबाबदारी गुंतवणूकदाराची आहे.
कोअर बँकिंग प्रणाली असल्याने एखाद्या बँकेच्या लहानशा खेडय़ात असलेल्या शाखेद्वारेही डिमॅट खाते उघडता येते असे मागील लेखात लिहिले होते, त्यावर प्रियंका आयरे यांनी प्रत्यक्षात तसे काही बँकात होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. मला याची जाणीव आहे. मी लिहिले ते  ‘तत्वत’  या भूमिकेतून. प्रत्यक्षात बँकांच्या शाखा डिमॅट खाते उघडण्याचा अर्ज भरून घेऊन तो मूळ डिमॅट कार्यालय जिथे आहे तिथे पाठवतात व ते कार्यालय खाते उघडते. यामध्ये दोन तीन दिवस लागू शकतात याचे कारण कुरीअर मार्फत अर्ज येण्यासाठी लागणारा वेळ. ऑडिट तपासणीच्या दृष्टीने एकत्रित सर्व कागदपत्रे उपलब्ध होणे सोयीचे व्हावे म्हणून  बँक तसे करतात. या बाबत मल्लिका मालवणकर यांनी बँक ऑफ इंडियाच्या एका खेडय़ातील शाखेने ‘आयपीओ’साठी त्वरीत डिमॅट खाते उघडून देण्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन जे सहकार्य केले त्याबाबत कळवले आहे.
सांप्रत शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणी होईपर्यंत Inactive असतात अशी व्यवस्था असल्याचे लिहिले होते. जामसंडे येथील अ‍ॅडव्होकेट इंद्रनील यांनी थोडा गुगली टाकणारा प्रश्न विचारला आहे की मग हे आधीच का केले नाही सेबीने? उत्तर असे आहे की, शक्यतो सर्व संभाव्य घटना काय घडू शकतात त्याचा विचार करून प्रक्रिया राबवलेली असते. अनेक बाबतीत असे होऊ शकेल अशी कल्पनादेखील नसते. तसे घडल्यावरच उपाययोजना केली जाते. इंद्रनील यांचा दुसरा प्रश्न मला पिंजऱ्यात उभा करणारा आहे. ते विचारतात की, आता सर्वत्र संगणकाचा वापर होत असल्याने असे प्रकार होणार नाहीत याची तुम्ही खात्री देता का? स्पष्ट सांगायचे झाले तर ‘नाही’. कारण यंत्रणा काटेकोरपणे बनवल्या जात असतात पण त्यावर कडी करून करून गुन्हेगार नवीन नवीन मार्ग शोधत असतात. गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी कुत्र्यांचा वापर पोलिसांनी सुरू करताच गुन्हेगार अध्र्या वाटेतून वाहन बदलून प्रवास करू लागले जेणेकरून पावलांच्या वासावरून माग काढता येऊ नये!! गुन्हेगारीचा प्रकार मग तो अíथक असो की अन्य प्रकारचा, होतच राहाणार. कारण या जगात आधी चोर आले आणि पोलीस दलाची स्थापना नंतर झाली!