देशाच्या चालू खात्यात यंदा तूट नोंदली जाण्याची शक्यता नाही, असे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांनी म्हटले आहे. कोविडत्रस्त अर्थव्यवस्थेतून सावरण्यासाठी भारताने आयातविषयक घेतलेल्या निर्बंध निर्णयाने यंदा तूट राहणार नाही, असे समर्थन मुख्य आर्थिक सल्लागारांनी केले आहे.

भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय) आयोजित एका आभासी परिषदेला संबोधित करताना मुख्य सल्लागारांनी जग यंदा एका निराळ्याच आव्हानांचा सामना करत आहे. करोना-टाळेबंदीमुळे देशाचा विकास दर खुंटण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

अमेरिकेच्या रोख्यांवरील व्याजाचा दाखला देत सुब्रमणियन यांनी २०१३ मधील उदाहरण दिले. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने केलेल्या तत्कालीन उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्था सावरल्याचेही ते म्हणाले.

मुख्य आर्थिक सल्लागारांनी म्हटले आहे की, भारताच्या चालू खात्यात विद्यमान वित्त वर्षांच्या पहिल्या तिमाहीत २० अब्ज डॉलरची वरकड आहे. ती दुसऱ्या तिमाहीत १९.८ अब्ज डॉलर राहण्याची शक्यता आहे.