राज्याच्या पर्यटन नकाशावर डहाणूला ठळक स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने २०१३ पासून आयोजित होत असलेल्या चिकू महोत्सवाची तिसरी आवृत्ती यंदा ६ व ७ फेब्रुवारीला योजण्यात आली आहे. येथील बोर्डी या सागर किनारी एस. आर. सावे कॅम्पिंग ग्राऊंडवर होत असलेल्या महोत्सवात, कोकण भूमी कृषी पर्यटन (एमटीडीसी) आणि नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रिकल्चर फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे विविध रंगतदार कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. येथे पिकणाऱ्या चिकूच्या आस्वादासह, पारंपरिक आदिवासी कला व कारागिरी, कुटिरोद्योग यांची ५० प्रदर्शन दालने येणाऱ्या पर्यटकांच्या आतिथ्यासाठी सज्ज असतील, असे आयोजन समितीच्या प्रमुख प्रियंका सावे यांनी सांगितले. राज्यातून व राज्याबाहेरून या महोत्सवाच्या दोन दिवसांच्या काळात २५,००० हून अधिक पर्यटकांकडून हजेरी लावली जाईल, असा आयोजकांचा विश्वास आहे.