अर्थसंकल्पाच्या अपेक्षाभंगाच्या धक्क्यातून सावरलेली  भांडवली बाजारातील निर्देशांक तेजी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली.

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३५३.२८ अंशांनी वाढून ४१,१४२.६६ वर पोहोचला. तर १०९.५० अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १२,०८९.१५ पातळीवर स्थिरावला. उद्योग-व्यवसायांचे वातावरण सुधारून गतिमान होण्याची आशा गुंतवणूकदारांच्या खरेदीपूरक व्यवहारातून दिसून आली.

शनिवारी अर्थसंकल्पदिनी जवळपास १,००० अंश आपटीनंतर मुंबई निर्देशांकाने गेल्या सलग तिन्ही सत्रात वाढ नोंदविताना १,४०७ अंश म्हणजेच ३.५४ टक्क्यांची भर नोंदविली आहे. परिणामी, सेन्सेक्सला पुन्हा एकदा त्याचा ४० हजारापुढील तर तीन व्यवहारांतील ४२७.३० अंश अर्थात ३.६६ टक्के वाढीमुळे निफ्टीला १२ हजारापुढील स्तर गाठता आला.

बुधवारी सेन्सेक्समध्ये टाटा स्टील सर्वाधिक, ५ टक्क्यांहून अधिक वाढला. त्याचबरोबर भारती एअरटेल, एचडीएफसी लिमिटेड, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आदीही वाढले. तर हीरो मोटोकॉर्प, पॉवरग्रिड, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, एनटीपीसी आदी मूल्य घसरणीच्या यादीत राहिले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, दूरसंचार, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, तेल व वायू, वित्त, माहिती तंत्रज्ञान जवळपास ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रीय निर्देशांक जवळपास त्याच प्रमाणात घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक १.३५ टक्क्यांपर्यंत वाढले.

भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची नजर आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या गुरुवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणावर असेल. चालू आर्थिक वर्षांचे हे शेवटचे द्विमासिक पतधोरण असेल. गेल्या वर्षभराभरात रिझव्‍‌र्ह बँकेने १.३५ टक्के व्याजदर कपात केली आहे. डिसेंबर २०१९ मधील पतधोरणादरम्यान रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते.