आज शेअर बाजारात नरमाईचे वातावरण असले तरी राष्ट्रीयीकृत बँकांच्या समभागांचे भाव २ ते ५ टक्क्यांपर्यंत वधारलेले दिसून आले. गुरुवारी तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक यांचे भाव सकाळच्या सत्रात पाच टक्क्यांपर्यंत वधारले. युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेने तिमाही नफ्याच्या बाबतीत फारशी उत्साहवर्धक कामगिरी केली नसली तरी या बँकांनी नफा सांभाळून ठेवताना, पत-गुणवत्ता सुधारत असल्याचा प्रत्यय मात्र दिला आहे.
युनियन बँकेचा ढोबळ अनुत्पादित मालमत्ता (ग्रोस एनपीए) तिमाही पूर्वीच्या ३.३६ टक्क्यांच्या तुलनेत ३.३६ टक्क्यांवरून यंदा मार्च २०१३ अखेर २.९८ टक्क्यांवर घसरले आहे. तर बँकेने एकंदर अपेक्षेपेक्षा चांगला रु. ७८९ कोटींचा तिमाही निव्वळ नफा कमावला आहे. बहुतांश बाजार विश्लेषकांनी नफ्याचे प्रमाण रु. ६१० कोटींच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तविला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीतील ७७३ कोटींच्या निव्वळ नफ्यात यंदा २.०७ टक्क्यांची मामुली वाढ झाली आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या ढोबळ एनपीएमध्ये तिमाहीगणिक ४.६१ टक्क्यांवरून ४.२७ टक्के अशी घट मार्च २०१३ अखेर दिसून आली. तर नक्त एनपीएही २.५६ टक्क्यांवरून २.३५ टक्के घसरला आहे. एनपीएमधील या सुधाराचे बाजाराने मोठय़ा दिलाने स्वागत केले आहे. तथापि बँकेचा मार्च २०१३ तिमाहीअखेर निव्वळ नफा २१ टक्क्यांनी घसरून रु. १,१३१ कोटींवर घसरला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 2:32 am