गेला सप्ताहभर तेजीच्या दिशेने वर सरकत असलेल्या बाजाराला सप्ताहाच्या अखेरच्या दोन दिवसांनी अनाकलणीय ब्रेक लावला आहे. या घसरणीची जी कारणे पुढे येताना दिसत आहे ती मात्र चक्रावून सोडणारी आहेत. सध्या निकालांच्या हंगामात सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांपेक्षा फार वेगळ्या कामगिरीची स्टेट बँकेकडून कोणी अपेक्षा करीत नव्हते. पुनर्रचित कर्जे आणि त्यापोटी तरतुदीतून नफ्याला लागलेली कात्री हे सरकारी बँकांबाबत दिसून येणारे लक्षण स्टेट बँकेबाबतही हमखास अनुभवास येणार हे स्पष्टच होते. तरी निकालाच्या आदल्या दिवसांपर्यंत निरंतर भाव वाढवीत आलेल्या स्टेट बँकेला तुलनेने चांगली वित्तीय कामगिरी नोंदवून निकालाच्या दिवशी जवळपास चार टक्क्यांनी आपटी खावी लागते आणि त्यातून बाजाराच्या निर्देशांकात एक टक्क्यांहून अधिक मोठी घसरण व्हावी, याचा तार्कीक अर्थ लावता येणे खरेच अवघड आहे.
दिवाळीचा सण परंपरागतरीत्या शेअर बाजारासाठी कलनिश्चिती करणारा ठरला आहे. यंदाचे लक्ष्मीपूजनाचे मुहूर्ताचे सौदै हे १३ नोव्हेंबरला दुपारी ३.४५ ते ५ वाजेपर्यंत चालतील. सेन्सेक्स आणि प्रामुख्याने निफ्टी निर्देशांक आपली गेल्या काही दिवसातील ५५५० ते ५७०० ही हालचाल पातळी भेदून मोठी मुसंडी मारेल असा बहुताशांचा कयास आहे. तसे व्हायचे झाल्यास या निर्देशांकात मोठा वाटा असलेल्या रिलायन्सनेही मग ७८० ते ८२० हे कडे भेदणे गरजेचे ठरेल.
सणांचा काळ असल्याने स्थावर मालमत्ता, सीमेंट, ग्राहकोपयोग उत्पादन, रंगाच्या कंपन्याबरोबरीनेच वाहन उद्योगातील टाटा मोटर्स, महिंद्रचे भावही स्वाभाविकपणे उंचावताना दिसत आहेत. या स्तंभात एचडीएफसी लि.वर लिहिल्यापासून या शेअरचा भाव एकांगी नवनवीन उच्चांक बनवीत आहे.
औषधी कंपन्यांच्या शेअर्सवर चांगल्या तिमाही कामगिरीचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. अपोलो हॉस्पिटल्स, कोलगेट, आयशर मोटर्स, मारुती सुझूकी, टायटन इंडस्ट्रीज, युनायटेड ब्रुअरीज्, येस बँक, सिप्ला, बायर, एचडीएफसी बँक यांच्यात सकारात्मक बातम्यांमुळे दमदार वाढ सुरू आहे. या स्तंभात उल्लेख आल्यानंतर ब्रुक लॅबॉरेटरीज्चा भाव तब्बल ३५% फुगला आहे. तर १०० रुपयांच्या आसपास सुचविलेल्या टीबीझेडने २२० रुपये पार करून भरपूर फायदा मिळवून दिला आहे.
पुढच्या आठवडय़ात दिवाळीची धामधूम, मुहूर्ताचे व्यवहार असले तरी बाजारातील एकूण उलालाढाल मात्र कमकुवत राहील. मुहूर्ताला खरेदीसाठी नोव्हार्टिस, झायडस वेलनेस हे मिडकॅप शेअर्स चांगले वाटतात.