वाहन उद्योगासाठी महत्त्वाची बाजारपेठ समजले जाणारे युरो झोन क्षेत्र व चीनमध्ये सध्या अर्थ अस्वस्थता पसरली आहे. याचा फटका भारताला बसण्याऐवजी देशासाठी ती खऱ्या अर्थाने व्यवसायवृद्धीची संधी असल्याची प्रतिक्रिया भारताच्या उद्योग क्षेत्रातून उमटत आहे. अर्थात सरकारकडून आता पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पावले टाकावीत अशी अपेक्षाही केली जात आहे.
प्रामुख्याने भारतातील वाहन उद्योग युरोपातून आयात होणाऱ्या सुटय़ा भागांसाठी आजवर अवलंबून होता, पण आता हे इतिहासजमा झाले असून, गेल्या काही वर्षांपासूनच चित्र पालटले आहे, असे मत टाटा मोटर्सच्या कार्यक्रम नियोजन व प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि नॅनोचे शिल्पकार गिरीश वाघ यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. ‘मेक इन इंडिया’मुळे तर उलट भारतीय वाहन उद्योगाकडे निर्यातदार म्हणून पाहिले जात आहे. बरोबरीने गेल्या काही महिन्यांपासून काहीशा मंदीच्या गर्तेत असणारी देशांतर्गत वाहन बाजारपेठही अधिक खुलेल, अशी त्यांनी पुस्ती जोडली.
अर्थ सुधारणांची वाट पाहणाऱ्या भारतीय वाहन उद्योगाने गेल्या काही महिन्यांमध्ये विक्रीतील कमालीची घसरण नोंदविली आहे, याकडे लक्ष वेधता वाघ म्हणाले की, एकूण वाहन उद्योगाचा प्रवास गेल्या काही कालावधीत मंदावता राहिला आहे; मात्र टाटा मोटर्सने ताज्या महिन्यांमध्ये या उद्योगापेक्षा अधिक गती, ३० टक्क्यांर्पयची वाढ राखली आहे, असे त्यांनी सांगितले. टाटा मोटर्सच्या नव्या तीन कारना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळेच ते शक्य झाले. नॅनोच्या जेनेक्स या नव्या वाहनातील बदलही जुनी ओळख पुसून वयाने व मनाने तरुण असलेल्या वर्गाला आकर्षित करणारी बनली आहे, असे त्यांनी सांगितले.
टाटा मोटर्सचा ‘ट्वेंटी ट्वेंटी’ आराखडा तयार असून कंपनी प्रत्येक श्रेणीतील नव्या वाहन निर्मितीसाठी सज्ज असल्याचे नॅनोचे शिल्पकार तसेच टाटा मोटर्सच्या कार्यक्रम नियोजन व प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. नेमकी कोणती व किती वाहने ही कधी दाखल होतील या संदर्भात ते ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ एवढेच म्हणाले. पैकी काहींवरचा पडदा नोएडामध्ये येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या वाहन मेळ्यात उघडण्याचे संकेतही त्यांनी दिले. गेल्या मेळ्यात सादर करण्यात आलेल्या मात्र अद्याप बाजारात न उतरलेल्या कंपनीच्या वाहनांची प्रतीक्षा साऱ्यांनाच आहे, असेही ते म्हणाले.
यशस्वी ‘होरायझनेक्स्ट’
मंचाला नव्या कारची जोड
‘होरायझनेक्स्ट’ उपक्रमातून सादर करण्यात आलेल्या तीन प्रवासी कारना गेल्या दोन वर्षांत मिळालेला प्रतिसाद मंदीच्या वातावरणात टाटा मोटर्सचा विश्वास उंचावणारा ठरला असून आकर्षक डिझाइन व अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाची कास धरत कंपनीने वर्षांला दोन नवीन वाहने बाजारपेठेत उतरविण्याचे लक्ष्य राखले आहे. असे करताना हॅचबॅक, सेदान, बहुपयोगी तसेच सध्या मागणी असलेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीही लवकरच बाजारात आण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. स्वत: विकसित केलेले रिव्होट्रॉन इंजिन सादर करत टाटा मोटर्सने जून २०१३ मध्ये होरायझनेक्स्ट हा उपक्रम सादर केला होता. याअंतर्गत प्रवासी श्रेणीतील नॅनो, बोल्ट व झेस्ट ही तीन वाहने नव्या अवतारात सादर केली गेली. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत तर या वाहनांच्या विक्रीने दुहेरी आकडय़ातील वाढ नोंदविली. कंपनीने या तिन्ही वाहनांचे बाह्य़ तसेच अंतर्गत डिझाईन वेगळे आणि त्यात अनेक नव्या सुविधांचीही भर असेल. किंबहुना येत्या काही वर्षांमध्ये देशात येणाऱ्या सुरक्षितताविषयक नवीन मानदंडांचा अवलंबही या वाहनांमध्ये आधीपासूनच करण्यात येणार आहे.