नवी दिल्ली : स्पर्धात्मक दर, वाढता ग्राहक त्याचबरोबर दूरसंचार सेवेचा जागतिक तुलनेत भारतातील वापर अधिक असूनही तुलनेत कंपन्यांना महसूल मात्र नगण्य मिळत असल्याची तक्रार भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी गुरुवारी व्यक्त केली. याबाबत दूरसंचार नियामक यंत्रणेने लक्ष घालण्याची आवश्यकताही मित्तल यांनी प्रतिपादन केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी उद्योजकांशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. यासाठी उपस्थित राहिलेल्या मित्तल यांनी वार्ताहरांसमोर एकूणच दूरसंचार क्षेत्रातील अस्थिर आर्थिक स्थितीबाबत मन मोकळे केले. स्पर्धात्मक दूरसंचार सेवा दरांमुळे क्षेत्र स्वत:चे मारक बनल्याचे मत व्यक्त करताना मित्तल यांनी अप्रत्यक्षरीत्या रिलायन्स जिओबाबत नाराजी व्यक्त केली.

भारतात महिन्याकाठी इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांकडून किमान १०० रुपयांचा डाटा वापरला जात असताना कंपन्यांना कमाल ४५० ते ५०० रुपयेपर्यंत माणशी सरासरी महसूल मिळायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जागतिक स्तरावर भारतातील डाटा वापर व दूरसंचार ग्राहकसंख्या अधिक असताना येथील कंपन्यांना आर्थिक लाभ मात्र त्या तुलनेत मिळत नाहीत, अशी खंतही मित्तल यांनी व्यक्त केली.

भारतातील दूरसंचार कंपन्यांवर ७.८० लाख कोटी रुपयांचा कर्जभार असून पैकी भारती एअरटेलने सप्टेंबर २०१९ अखेरच्या तिमाहीत २३,०४५ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. कंपनीने सरकारला द्यावयाच्या थकीत रकमेपोटी २८,४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.