ब्रेक्झिटमुळे निर्माण झालेल्या मंदीचा फटका; हजारो लोक परदेशात अडकले

लंडन : आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी निधी न मिळाल्याने ब्रिटनच्या थॉमस कुक या प्रवासी पर्यटन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे. त्यामुळे या कंपनीच्या मार्फत सहलीला गेलेले हजारो लोक परदेशात अडकून पडले आहेत.

ब्रिटिश सरकारने म्हटले आहे की, ही कंपनी १७८ वर्षे जुनी असून  कंपनीकडून दीड लाख ब्रिटिश पर्यटक विविध देशांत गेले आहेत. आता त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. शांतता काळातील ही सर्वात मोठी परतपाठवणी मोहीम असणार आहे. सोमवारी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने सांगितले की, थॉमस कुक कंपनीने कामकाज थांबवले आहे. त्यांच्या चार हवाई कंपन्यांची विमाने बंद करण्याची वेळ आली आहे.

एकूण १६ देशांतील २१ हजार कर्मचाऱ्यांच्या नोक ऱ्या आता जाणार असून त्यात ब्रिटनमधील ९ हजार जणांचा समावेश आहे. पर्यटकांकडून नोंदणी कमी झाली असल्याचे या कंपनीने काही महिन्यांपूर्वी म्हटले होते.

ब्रेक्झिटची अनिश्चितता घातक ठरली असून त्यामुळे मंदीचा सामना करावा लागला असे कंपनीचे म्हणणे आहे. शुक्रवारी कंपनीने सांगितले की, कंपनी बंद पडण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी  आम्ही २५० दशलक्ष डॉलर मदत मागितली होती. आठवडा अखेरीस पतपुरवठादार व भागधारकांशी चर्चा करणार होतो. थॉमस कुकची विमानसेवाही असून त्यांची ब्रिटनमध्ये सहाशे प्रवासी दालने आहेत.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर फँकहॉसर यांनी सांगितले की, कंपनी बंद करावी लागली याचा खेद वाटतो. अनेक महिने आमचे प्रयत्न सुरू  होते; मात्र उद्योग वाचवण्यासाठीच्या वाटाघाटीत आम्हाला यश आले नाही. याचा फटका अनेक लोकांना बसणार असून त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

मोनार्चनंतर दुसरी घटना

२०१७ मध्ये मोनार्च एअरलाइन्स कंपनी अशीच दिवाळखोरीत निघाली तेव्हा सरकारने त्यांच्या प्रवाशांना परत आणण्यासाठी ६० दशलक्ष पाउंड खर्च केले होते. थॉमस कुक कंपनी १८४१ मध्ये सुरू झाली. त्यांची सुरुवातीला एक दिवसाची रेल्वे प्रवास सेवा होती. आता त्यांची १६ देशांत कार्यालये आहेत. गेली काही वर्षे ते उद्योग वाचवण्यासाठी झगडत होते. आता १० लाख प्रवासी या कंपनीतर्फे केलेले बुकिंग रद्द करणार आहेत. सरकारच्या विमा योजनेनुसार त्यांना पैसे परत मिळतील.