निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक नव्या उच्चांकावर असून केवळ तीन बड्या कंपन्यांच्या जीवावर निर्देशांकानं ही मजल मारली आहे. हे तीन बडे शेअर आहेत रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस व हिंदुस्तान युनिलीव्हर. निफ्टीच्या वाढीत या तीन कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीतल्या वाढीचा वाटा तब्बल दोन तृतीयांश इतका आहे. काल मंगळवारी सेन्सेक्स या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 38,938 व निफ्टीनं 11,760 अशी विक्रमी मजल मारली.

थॉमसन रॉयटर्सच्या माहितीनुसार या वर्षी आत्तापर्यंत निफ्टीची जी वाढ झाली आहे, त्यामध्ये टीसीएसच्या शेअरचा वाटा 35 टक्के इतका आहे. वर्षात आत्तापर्यंत टीसीएसच्या शेअरचा भाव 56 टक्क्यांनी वधारला असून त्यानं निफ्टीला चांगलाच हात दिला आहे. टीसीएसच्या शेअरचं निफ्टीमधलं प्राबल्य 9.25 टक्के इतकं आहे. निफ्टी 50 हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक या वर्षात आत्तापर्यंत 13 टक्क्यांनी वधारला आहे.

टीसीएसखेरीज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरनं निफ्टीच्या वाढीत 27 टक्क्यांचा हिस्सा उचलला आहे. या वर्षात आत्तापर्यंत रिलायन्सचा शेअर 46 टक्क्यांनी वधारला आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवली बाजारातील मूल्यानं आठ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. या शेअरचा भावही विक्रमी पातळीवर आहे. भांडवली मूल्याचा विचार केला तर मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातली आघाडीची कंपनी आहे.

याशिवाय हिंदुस्तान लीव्हर या कंपनीच्या शेअरनं देखील निफ्टीच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या वर्षात आत्तापर्यंत एचयुएलचा शेअर 31 टक्क्यांनी वधारला असून निफ्टीच्या वाढीत या शेअरचं योगदान 14 टक्के इतकं आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की निफ्टी दिवाळीपूर्वी 12 हजारांचा टप्पा पार करेल. निफ्टीवर एका वर्षात 25 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला तर आश्चर्य वाटायला नको असा विश्वास काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.