दोन कोटींपर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवर EMI वरील व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज माफ करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. आता हीच सवलत सर्व प्रकारच्या कर्जांवर देण्याचा विचार सुरु आहे. गृह कर्ज तसेच मोरॅटोरियमच्या काळात वेळेवर EMI भरलेल्या सगळ्याच कर्जधारकांना व्याजात सवलत मिळू शकते. मोरॅटोरियम म्हणजे कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार. एक मार्च ते ३१ ऑगस्ट या मोरॅटोरियम काळातील व्याजावरील व्याज माफ करण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. दिवाळीआधी यावर अधिकृत घोषणा होऊ शकते. दोन अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने याबद्दल वृत्त दिले आहे.

“चक्रवाढ व्याज माफी देताना सेक्टरनिहाय दुजाभाव केला जाणार नाही. व्यक्तीगत कर्जावर चक्रवाढ व्याज माफी द्यायची आणि गृहकर्जदाराला द्यायची नाही, हे शहाणपणाचे ठरणार नाही. दोन कोटी पर्यंत कर्ज घेणाऱ्या सर्वांनी ही व्याजमाफी दिली जाईल” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अर्थमंत्रालयात हा अधिकारी वरिष्ठ पदावर आहे.

२७ मार्च रोजी आरबीआयने मुदत कर्जावर तीन महिन्यांसाठी मोरॅटोरियम कालावधी जाहीर केला. करोना व्हायरसमुळे या काळात देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर २२ मे रोजी आणखी तीन महिन्यासाठी म्हणजे ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत हा मोरॅटोरियमचा कालावधी वाढवला. मोरॅटोरियम म्हणजे कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार. लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय, नोकरी बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता.